Latest

धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या! शिवसेनेची दिल्ली हायकोर्टात धाव

दीपक दि. भांदिगरे

नवी दिल्ली/मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवले आहे. यामुळे शिंदे आणि ठाकरे गटाला शिवसेनेचे नाव पुढील आदेशापर्यंत वापरता येणार नाही. या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने याचिका दाखल केली आहे. चिन्ह गोठवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या, अशी मागणी शिवसेनेने याचिकेतून केली आहे.

धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घाईगडबडीत घेतला आहे. याबाबत आम्ही दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयात आज किंवा उद्या यावर सुनावणी होईल, अशी आशा ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी व्यक्त केली आहे. दिल्ली उच्च न्यायालय वेगळे निर्देश देतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण चिन्ह गोठवले असून शिंदे आणि ठाकरे गटाला शिवसेनेचे नाव पुढील आदेशापर्यंत वापरता येणार नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भात अंतरिम आदेश दिले आहेत. अंधेरी ( पूर्व) विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीत आता दोन्ही गटांना शिवसेनेचे चिन्ह वापरता येणार नाही. दोन्ही गटांना पोटनिवडणुकीसाठी निवडणूक चिन्हाची यादी आयोगाकडून दिली जाईल. यातील एका निवडणूक चिन्हाची निवड या गटांना करावी लागेल. सोमवारी, १० ऑक्टोबरला दुपारी १ पर्यंत ठाकरे आणि शिंदे गटाला निवडणूक चिन्हा संबंधीची प्राथमिकतेची माहिती आयोगाला द्यावी लागेल. विशेष म्हणजे हे दोन्ही गट त्यांच्या नावा सोबत 'सेना' हा शब्द वापरू शकतील अशी मुभा आयोगाने दिली आहे.

धनुष्य आणि बाण निवडणूक चिन्हासह शिवसेना महाराष्ट्रातील एक मान्यता प्राप्त पक्ष आहे. पक्षाच्या घटनेनुसार वरिष्ठ स्तरावर एक प्रमुख आणि एक राष्ट्रीय कार्यकारिणी असते, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे. २५ जून २०२२ ला उद्धव ठाकरे यांच्या वतीने अनिल देसाई यांनी आयोगाला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काही आमदारांकडून पक्ष विरोधी कारवाई संदर्भात माहिती देण्यात आल्याचे आयोगाने सांगितले आहे. देसाई यांनी शिवसेना अथवा बाळासाहेब यांच्या नावाने कुठलाही पक्ष स्थापन करण्यासंबंधी आक्षेप नोंदवला होता, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

तदनंतर अनिल देसाई यांनी १ जुलै २०२२ रोजी ३० जून २०२२ ला काढलेले ३ पत्र जोडले होते. यात पक्ष विरोधी कारवाया करणाऱ्या चार सदस्यांनी पक्षाची सदस्यता सोडल्याचा उल्लेख पत्रातून करण्यात आला होता, असे आयोगाने सांगितले आहे. म्हणून सदस्यांना शिवसेनेचे उपनेते पदावरून हटवण्यात येत असल्याचे देसाई यांनी सूचित केले होते. या सदस्यांमध्ये गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांचे नाव होते. उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख आहेत, असे देखील ठाकरे गटाकडून सांगण्यात आले होते.

तीन चिन्ह आणि तीन नावांचा पर्याय

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी, आम्ही निवडणूक आयोगाकडे तीन चिन्ह आणि तीन नावांचा पर्याय दिला असल्याचे म्हटले आहे.  "निवडणूक आयोगाने आम्हाला यापैकी एक चिन्ह व नाव ताबडतोब द्यावे जेणेकरुन आम्ही त्वरीत जनतेमध्ये जावू शकू. त्रिशूळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाला या चिन्हा पर्याय आम्ही दिला आहे. तसेच नावासाठी शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे तीन पर्याय आम्ही निवडणूक आयोगाला पाठवले आहेत." असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT