घनसावंगी; पुढारी वृत्तसेवा : घनसावंगी तालुक्यातील समृद्धी शुगर कारखान्याचे चेअरमन सतिष घाटगे यांनी राजकारणात उतरून आणखीन चांगली प्रगती करावी, असे आवाहन माजीमंत्री तथा शिंदे गटाचे उपनेते अर्जुन खोतकर यांनी केले आहे. खोतकरांच्या या वक्तव्यांने पुन्हा एकदा तालुक्यात राजकीय चर्चांना ऊत आला आहे. गुरूवारी (दि8) समृद्धी गणेश फेस्टिव्हलच्या वतीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना खोतकर म्हणाले, कारखान्याचे चेअरमन सतिष घाटगे यांनी उद्योग क्षेत्रात चांगली प्रगती केलेली असून, त्याचबरोबर त्यांनी राजकारणात उतरून आणखीन प्रगती करावी. यासाठी मी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रस्ताव घेतला आहे. सतिष घाटगे यांना राजकीय आमंत्रण देण्यासाठीच मी याठिकाणी आलो असल्याचेच त्यांनी उपस्थितांना सांगितले. यासाठी गणपती बाप्पा त्यांना सुदबुद्धी देऊन, त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे विघ्न दूर करो, असेही ते म्हणाले.
या प्रस्तावावर त्यांनी विचार करावा असेही खोतकर यांनी शेवटी सांगितले. यावेळी सर्वपक्षीय मान्यवरांसह अनेकांची उपस्थिती होती. दरम्यान,खोतकर यांच्या विधानाने तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले असून, अनेकांकडून याबाबत तर्क- वितर्क लावले जात आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत राजेश टोपे विरूद्ध हिकमत उढाण, सतिष घाटगे असा तिरंगा सामना रंगणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
समृद्धी गणेश फेस्टिव्हलमध्ये मागील दहा दिवसांपासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. यासाठी जिल्हाभरातील सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रण देण्यात आले. उद्योग क्षेत्रात काम करताना अनेक अडचणी येत असतात. मात्र खोतकर यांनी केलेल्या राजकीय विधानावर भविष्यात नक्कीच विचार करू, असे उत्तर सतिष घाटगे यांनी दिले.