Latest

Share Market Updates | मान्सून स्पिरीट! सेन्सेक्स, निफ्टीची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी, ‘हे’ घटक ठरले महत्त्वाचे

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : देशातील बहुतांश भागात मान्सून दाखल झाल्याने गुंतवणूकदार सुखावले आहेत. यामुळे भारतीय शेअर बाजारात तेजीचे वारे आले आहे. तसेच अमेरिकेच्या शेअर बाजारातील वाढीचा मागोवा घेत आज बुधवारी भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) ने विक्रमी उच्चांक गाठत तेजीत व्यवहार केला. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्सने ६४ हजारांचा टप्पा ओलांडला. तर निफ्टीने १९ हजारांवर झेप घेत सर्वकालीन उच्चांक गाठला. पहिल्यांदाच Nifty १९ हजारांवर पोहोचला. त्यानंतर सेन्सेक्स आज ४९९ अंकांनी वाढून ६३,९१५ वर बंद झाला. तर निफ्टी १५४ अंकांच्या वाढीसह १८,९७२ वर स्थिरावला. (Share Market Updates)

तीन सत्रांतील सातत्यपूर्ण वाढीमुळे निफ्टी ५० हा १९ हजारांवर पोहोचला. याआधीच्या दिवशी निफ्टी निर्देशांकाने १८,८९८२ अंकांची विक्रमी पातळी गाठली होती. गेल्या तीन सत्रांमध्ये गुंतवणूकदार सुमारे ३ लाख कोटींनी श्रीमंत झाले आहेत. मान्सूनची दमदार सुरुवात, HDFC बँक आणि हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पद्वारे विलीनीकरण पूर्ण होण्याची घोषणा आदी घटक बाजारातील नफ्याला कारणीभूत ठरले.

निफ्टीवर अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, जेएसडब्ल्यू स्टील, बजाज ऑटो आणि टाटा मोटर्स हे टॉप गेनर्स होते, तर एचडीएफसी लाइफ, टेक महिंद्रा, हीरो मोटोकॉर्प, अपोलो हॉस्पिटल्स आणि एम अँड एम हे घसरले. मेटल, पॉवर, फार्मा आणि कॅपिटल गुड्स प्रत्येकी १ टक्क्यांनी वाढले. सर्व क्षेत्रीय निर्देशांकांनी आज हिरव्या चिन्हात व्यवहार केला. बीएसई मिडकॅप इंडेक्स ०.७ टक्क्यांनी वाढला, तर स्मॉलकॅप इंडेक्स सपाट पातळीवर बंद झाला.

मान्सूनमुळे शेअर बाजारात तेजीचे वारे

जूनच्या पहिल्या पंधरवड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. पण मंगळवारी देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. यामुळे गुंतवणूकदारांच्या भावनेला आणखी बळ मिळाले आहे. देशात मंगळवारी ११.२ मिमी पाऊस पडला, जो ७.५ मिमी सरासरीपेक्षा ५० टक्के अधिक आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि इन्फोसिस यांचे निफ्टीच्या विक्रमी उच्चांकात योगदान राहिले. तसेच अमेरिकेतून मिळालेले आर्थिक सुधारणेचे संकेत आणि चीनच्या संभाव्य प्रोत्साहन उपायांमुळे जागतिक स्तरावर गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या आहेत.

सेन्सेक्स आज ६३,७०१ अंकांवर खुला झाला होता. त्यानंतर त्याने ६४ हजारांचा टप्पा ओलांडला. निफ्टी सुरुवातीला १२९ अंकांच्या वाढीसह १८,९४७ वर होता. त्यानंतर त्याने पहिल्यांदाच १९ हजारांवर झेप घेत उच्चांक नोंदवला. (Share Market News)

हे शेअर्स टॉप गेनर्स

आज सर्व क्षेत्रात खरेदी दिसून आली. सेन्सेक्सवर टाटा मोटर्स, एनटीपीसी, टायटन, सन फार्मा, एलटी, रिलायन्स, इंडसइंड बँक, एचडीएफसी, इन्फोसिस हे शेअर्स वाढले. तर टेक महिंद्रा, एम अँड एम, बजाज फिनसर्व्ह, कोटक बँक हे शेअर्स घसरले.
क्षेत्रीयमध्ये निफ्टी मेटल ०.९९ टक्के, निफ्टी PSU बँक ०.६० टक्के वाढला. फायनान्सियल, ऑटो, एफएमसीजी, आयटी, मीडिया, रियल्टी, कन्झूमर ड्युरेबल्स, ऑइल आणि गॅस हेदेखील वधारले.

अदानी एंटरप्रायझेसला दिलासा

अदानी समूहातील (Adani Group) अदानी एंटरप्रायझेसचा शेअर्स निफ्टीवर सर्वाधिक ४.६ टक्के वाढला. GQG पार्टनर्स आणि इतर गुंतवणूकदारांनी ब्लॉक डीलद्वारे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये १ बिलियन डॉलर किमतीचे अतिरिक्त स्टेक खरेदी केले, असे एका वृत्तात म्हटले आहे. निफ्टी ५० वर अदानी एंटरप्रायझेसचा शेअर टॉप गेनर राहिला. हा शेअर सुमारे ५ टक्के वाढून २,३९४ वर पोहोचला. दरम्यान, अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स सुमारे ६ टक्क्यांनी घसरले. (Share Market Updates)

दरम्यान, निफ्टी स्मॉलकॅप ५० हा ०.६९ टक्क्यांनी, निफ्टी स्मॉलकॅप १०० हा ०.६१ टक्क्यांनी, निफ्टी स्मॉलकॅप ३५० हा ०.५८ टक्क्यांनी वाढला आणि निफ्टी मिडस्मॉलकॅप ४०० हा ०.५१ टक्क्यांनी वधारला.

आशियाई बाजारांमध्ये टोकियोतील निर्देशांक हिरव्या चिन्हात तर सेऊल, शांघाय आणि हाँगकाँगमधील बाजारात घसरण दिसून आली. बेंचमार्क निक्केई २२५ निर्देशांक २.०२ टक्के अथवा ६५५.६६ अंकांनी वाढून ३३,१९३ वर संपला, तर व्यापक टॉपिक्स निर्देशांक १.९९ टक्के म्हणजेच ४४.७९ अंकांनी वाढून २,२९८ वर पोहोचला. मंगळवारी अमेरिकन बाजारात तेजी राहिली होती.

NSE डेटानुसार, मंगळवारी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी २,०२४ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची निव्वळ खरेदी केली, तर स्थानिक गुंतवणूकदारांनी १,९९१ कोटी रुपयांचे शेअर्स विकले.

या शेअरची दमदार कामगिरी

सूरत मेट्रो रेल्वे फेज-१ साठी ७२ स्टँडर्ड गेज कारसाठी गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून डिझाईनिंग, मॅन्युफॅक्चरिंग, सप्लायिंग, टेस्टिंग, कमिशनिंग आणि ट्रेनिंगसाठी ८५७ कोटी ऑर्डर मिळाल्यानंतर टिटागढ रेल सिस्टिमचे शेअर्स (Shares of Titagarh Rail Systems) ५ टक्के वाढले आणि बीएसईवर हा शेअर बुधवारच्या ट्रेडमध्ये ५२ आठवड्यांच्या उच्चांकी ५२९ रुपयांवर पोहोचला.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT