Share Market | अर्थज्ञान : शेअर मार्केट समजावून घेताना… | पुढारी

Share Market | अर्थज्ञान : शेअर मार्केट समजावून घेताना...

अनिल पाटील, प्रवर्तक, एस पी वेल्थ, कोल्हापूर

मागील आठवड्यांमध्ये आपण प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार यांचे कार्य कसे चालते हे पाहिले. सेकंडरी मार्केटमध्ये कंपनी लिस्ट झाल्यानंतर त्याचा खरेदी-विक्री व्यवहार कसा होतो, खरेदी करत असताना किती प्रकारचे ऑर्डर्स आपण देऊ शकतो आणि ऑर्डर दिल्यानंतर शेअरची सेटलमेंट कशी होते, हेही समजावून घेतलेले आहे. या प्रकरणांमध्ये आपण शेअर मार्केटची दिशा दाखविणारे इंडिकेटर्स कसे काम करतात ते पाहू. (Share Market)

शेअर बाजार निर्देशांक Market Index- मार्केट इंडेक्स म्हणजे शेअर बाजार निर्देशांक हा एक सूचक आहे, जो भारताच्या शेअर बाजारातील सर्व प्रमुख बदल दर्शवितो. वेगवेगळे निर्देशांक तयार करताना शेअर बाजार निर्देशांक अनेक कंपन्यांचे बाजार भांडवल, व्यवसाय आकार या गोष्टी पाहून निर्देशांक संच तयार केला जातो. NSE, BSE वरील लिस्टिंग केलेल्या कंपन्यांमधून शेअर्स निवडले जातात.

शेअर मार्केटची दिशा पाहण्यासाठी बाजारामधील वेगवेगळे निर्देशांक (Index) वरून आपण दिशा समजू शकतो. बाजारातील निर्देशांकाचे अनेक प्रकार आहेत. निर्देशांक म्हणजे एक असा संच की, अनेक कंपन्यांचा त्याच्यामध्ये समावेश असतो. उदाहरणार्थ सेन्सेक्स (SENSEX). स्टॉक एक्स्चेंजवरील मार्केट कॅपिटलायझेशननुसार पहिल्या 30 कंपन्यांचे सरासरी मूल्य म्हणजे सेन्सेक्स होय. बाजारामध्ये मंदी असेल तर सेन्सेक्स निर्देशांक खाली खाली येत असतो आणि जेव्हा तेजी असते तेव्हा सेन्सेक्स हा वाढत असतो. आपल्या देशामध्ये 1979 साली सेन्सेक्सची 100 अंकांनी सुरुवात झालेली आहे. आज मी तिला तो 63000 च्या घरात गेला आहे. गेल्या 44 वर्षांत 15% हून अधिक परतावा दिला आहे. पहिल्या 30 कंपन्यांच्यामध्ये काही कंपन्यांचे मार्केट कॅपिटल कमी झाले तर ते सेन्सेक्समधून बाहेर काढले जाते आणि नवीन कंपन्यांना तिथे स्थान मिळते. रिलायन्स कम्युनिकेशन, टाटा पॉवर हिंडाल्को, अशा कंपन्यांचे कॅपिटल मार्केट कमी झाल्याने त्या बाहेर पडल्या आहेत. त्यांच्या जागी नवीन कंपन्या अधिक झाल्या आहेत. बाजारातील निर्देशांक इंडेक्स हे तीन प्रकारचे असतात. (Share Market)

शेअर बाजार निर्देशांकांचे प्रकार काय आहेत?

खाली नमूद केलेले शेअर बाजार निर्देशांकांचे तीन वेगवेगळे प्रकार आहेत.
1) बेंचमार्क निर्देशांक
2) क्षेत्रीय निर्देशांक
3) मार्केट-कॅप आधारित निर्देशांक

1) बेंचमार्क निर्देशांक

BSE आणि NSE वरील देशातील थोड्याच; पण मोठ्या कंपन्यांचे सूचिबद्ध निर्देशांक या प्रकारात मोडतात. सेन्सेक्स म्हणजे देशातील पहिल्या 30 कंपन्या होय.

निफ्टी 50 – देशातील सर्वोत्तम काम करणार्‍या प्रथम 50 क्रमांक असलेल्या कंपन्या होय. BSE सेन्सेक्स खाली आला म्हणजे देशातील प्रमुख 30 कंपन्यांचे सरासरी शेअर्स भाव खाली येणे होय. काही कंपन्यांचे दर वाढलेले असतात, तर काही कंपन्यांचे भाव पडलेले असतात. या चढ-उताराची सरासरी दिशा दर्शवितात. एखाद्या कंपनीची कामगिरी खराब अथवा काही कारणांनी बाजारमूल्य घसरले, तर ती कंपनी सेन्सेक्समधून बाहेर पडते आणि त्या जागी दुसरी कंपनी अधिक होते. सेन्सेक्समध्ये नेहमी सर्वोत्तम कामगिरी असलेल्या कंपन्याच असतात. तुम्हाला कोणकोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करायची हे समजत नसेल, तर तुम्ही सेन्सेक्स किंवा निफ्टी खरेदी करू शकता. इथे जोखीम कमी असते. त्या त्या निर्देशांकात समाविष्ट असलेल्या प्रत्येक स्टॉकला त्याच्या सध्याच्या बाजारभावानुसार किंवा बाजार भांडवलावर अवलंबून विशिष्ट वेटेज दिले जाते.

2) क्षेत्रीय निर्देशांक (Sector Index)

BSE आणि NSE एक्स्चेंजवर अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील कंपन्या लिस्ट झालेल्या असतात. एका विशिष्ट क्षेत्रांतर्गत येणार्‍या कंपन्यांच्या एकत्रित संचाला सेक्टर इंडेक्स म्हणतात. BSE हेल्थकेअर आणि NSE फार्मा, निफ्टी ऑटो, बँकिंग, आय टी, पी एस यू. मेटल रियल्टी मीडिया, एनर्जी, इन्फ्रा, सर्व्हिस, फिन सर्व्हिससारखे अनेक निर्देशांक आहेत. हे असे क्षेत्रीय इंडेक्स पाहावयास मिळतात. त्या क्षेत्रातील कामगिरीनुसार निर्देशांकांची वाटचाल होत असते. क्षेत्रातील खराब कामगिरी, मंदीची चांगली कामगिरी तेजीची दिशा दाखवितात.
(पूर्वार्ध)

Back to top button