Latest

Pawar vs Pawar : शरद पवार भाषण; जाणून घ्या ठळक दहा मुद्दे

सोनाली जाधव

मुंबई, पुढारी वृत्तसेवा :  मुंबईत पोस्टर लागली की, फोटो माझा. आपले नाणे चालणार नाही, हे त्यांना माहीत आहे. ज्यांचे नाणे खरे नाही, ते खणखण वाजणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी पुतणे अजित पवार यांच्या सरबत्तीला प्रत्युत्तर दिले. पांडुरंग म्हणायचे, गुरू म्हणायचे, पांडुरंगाच्या दर्शनाला बडवे अडवतात म्हणायचे, ही गमतीची गोष्ट आहे, असे ते म्हणाले. आतापर्यंत मी अनेक चिन्हांवर लढलो. आता आमचे घड्याळ चिन्ह घेऊन जाऊ म्हणतात. चिन्ह जाऊ देणार नाही. चिन्ह जाणार नाही. जो राजकीय विचार आपल्याला मान्य नाही, त्याच विचारांच्या पंक्तीला जाऊन बसणे योग्य नाही, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. ( Pawar vs Pawar )  जाणून घ्‍या बुधवारी शरद पवारांनी केलेल्‍या भाषणातील ठळक दहा  मुद्दे.

सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता सुद्धा राज्य चालवू शकतो

आजची बैठक ऐतिहासिक आहे. संबंध देशाचे लक्ष लागले आहे, चर्चा आहे. २४ वर्षापूर्वी मुंबई शहरामध्ये तुम्हा सगळ्यांच्या उपस्थित राष्ट्रवादीचा जन्म झाला. शिवाजी पार्कवर स्थापना केली. २४ वर्षे झाली. यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेतृत्वाची फळी निर्माण करण्यात राष्ट्रवादीला यश आले. अनेक मंत्री, आमदार, खासदार झाले. अनेकांना मंत्रिमंडळात काम करण्यास संधी मिळाली. सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता सुद्धा राज्य चालवू शकतो हे राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांनी देशाला दाखवले. अनेक नवीन नेते तयार केले. एकच भावना होती. महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा. राज्यातील शेवटच्या माणसापर्यंत प्रकाश कसा येईल याची काळजी घ्यायची. त्या कामामध्ये तुमच्या कष्टाने आपण यशस्वी झालो.

आणखी पुढे जायचे आहे, संकटे खूप आहेत

आज आपल्याला आणखी पुढे जायचे आहे, संकटे खूप आहेत, असेही पवार ती संकटे ज्यांची वैचारिक भूमिका देशाच्या हिताची नाही. अशांच्या हातामध्ये देशाची सूत्रे आहेत. ज्यांच्या हातामध्ये सूत्रे आहेत, त्यांच्यापुढे त्यांच्या सहकाऱ्यांना सुद्धा त्यांच्या मनातील कल्पना मांडण्यास मर्यादा आहेत. जनतेची भावना वेगळी असेल तर मार्ग काढणे हे सूत्र होते; परंतु हे बदलले आहे. सुसंवाद राहिला नाही. सामान्य माणसाची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संवाद ठेवावा लागतो, ते दुरुस्त केले पाहिजे आज तो संवाद नाही. आम्ही सत्ताधारी नाही. सर्व राज्यात अस्वस्थता आहे. प्रयत्न सुरू केले लोकशाही टिकवण्यासाठी संवाद सुरू केला सत्ताधारी पक्षात नाही त्यांच्याशी आम्ही संवाद साधला. त्यामुळे ज्यांच्या हातात सत्ता त्यांच्या मनात अस्वस्थता आहे.

नुसते आरोप नकाे, चूक असेल तर कारवाई केली पाहिजे

पंतप्रधानांनी राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. आठ दिवसांपूर्वी देशाच्या पंतप्रधानांनी एक भाषण केले आणि त्यांनी बारामतीच्या सभेत सांगितले, प्रशासन कसे चालवायचे हे पवारसाहेबांचे बोट धरुन शिकलो. नंतर आले तेव्हा टीका केली. नुसते आरोप करुन चालणार नाही जर चुका असेल तर कारवाई केली पाहिजे. देशाचा नेता जनसामान्यांच्या समोर बोलतो तेव्हा राष्ट्रवादी इतका भ्रष्ट आहे असे वाटत असेल तर याचा अर्थ आधार नसलेल्या गोष्टी बोलत आहेत.

उद्या कुणीही उठेल मी राष्ट्रवादीचा आहे सांगेल

सत्ताधारी आमदार खासदार खाजगीत सांगतात. आज काही लोकांनी बाजुला जाण्याची भूमिका घेतली त्याचे  दुःख आहे. ज्यांनी घाम गाळून चांगले दिवस आणले त्यांना विश्वासात न घेता, पक्षाला विश्वासात घेतले नाही हे योग्य नाही. नाशिकला पक्षाच्या कार्यालयाचा ताबा घेतला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात आहात का? उद्या कुणीही उठेल मी राष्ट्रवादीचा आहे सांगेल, ते ताब्यात घेणे योग्य नाही.

त्यांना माहीत आहे. आपले नाणे  चालणार नाही

आज आमच्या मित्रांचा मेळावा झाला. त्यांच्या मागे फोटो बघितले का तुम्ही? त्यात सर्वात मोठा फोटो माझा होता. मुंबईभर माझे फोटो लावले आहेत. त्यांना माहीत आहे. आपले नाणे  चालणार नाही. त्यांचे नाणे खरे नाही ते  खणकण वाजणार नाही. त्यांचे नाणे खरे नाही. हे लोकांनी ओळखले आहे. त्यांचे नाणे खरे नाही ते खणकन वाजणार नाही अडचण नको म्हणून त्यांनी माझा फोटो वापरला आहे. पांडुरंगाच्या दर्शनाला बडवे जाऊ देत नाहीत असाही आरोप झाला. कसले बडवे? पांडुरंगाच्या दर्शनाला जायचे असेल तर कुणी अडवत नाही. पांडुरंग म्हणायचे, गुरु म्हणायचे आणि आमच्याकडे दुर्लक्ष झाले असे सांगायचे ही गंमतीची गोष्ट आहे. राज्यकर्ते असे असले पाहिजे. आज उपमुख्यमंत्री भाजपचे आहेत. अनेकवेळा भाषणे केली. वेगळा विदर्भ केला पाहिजे त्याशिवाय मी हे करणार नाही, आज वेगळा विदर्भ लक्ष घातले नाही. दिलेला शब्द कोणी पाळला नाही. कारण नसताना राज्याच्या ऐक्याला सुरूंग लावायची भाषा या लोकांनी बोललेली आहे.

भाजप सोबत गेलेल्यांचे काय झाले सर्वांनी पाहिले

आज आपले लोक गेले. १० दिवसांपूर्वी त्यांचे भाषण ऐकले असला तर महाराष्ट्रात असला मुख्यमंत्री पाहिला नाही आणि आता ते त्या असल्या मुख्यमंत्र्यांबरोबर आहेत.पुलोदचा प्रयोग आणीबाणीच्या काळात सर्वांनी घेतला. भाजप सोबत गेलो तर चुकलो काय? असा प्रश्न अजित पवार गट विचारत आहे. नागालँडमध्ये सरकारमध्ये गेलो. नागालँडमध्ये.  राष्ट्रवादीचे सात आमदार निवडूण आले. आम्ही सरकारला बाहेरून पाठिंबा दिला आम्ही सरकारमध्ये गेला नाही. इथे काय घडले इथे आतच जाऊन बसले. आज जे जे लोक या देशामध्ये भाजप सोबत गेले त्या प्रत्यकाचा इतिहास आपण पाहिला आहे. त्यांचे काय झाले सर्वांनी पाहिले आहे.

इंदिरा गांधीच्या काळातही शिवसेनेने काँग्रेसला पाठिंबा दिला

आज असे सांगितले जाते तुम्ही शिवसेनेसोबत गेला ते चालते का? मग भाजपसोबत का नाही? फरक आहे. आणिबाणीच्या काळामध्ये इंदिरा गांधी यांच्या विरुद्ध वातावरण होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचे स्टेटमेंट आले. देशाच्या हितासाठी इंदिरा गांधी यांना मदत केली पाहिजे. सहकार्य इथपर्यंत केले की विधानसभेच्या, निवडणुकीमध्ये शिवसेनेने एकही उमेदवार उभा केला नाही आणि काँग्रेसला पाठिंबा दिला होता.

भाजपचे हिंदूत्व विखारी, मनुवादी

शिवसेना आणि भाजपच्या  हिंदूत्वामध्ये फरक आहे. शिवसेनेचे हिंदूत्व आहे ते लपवून ठेवत नाहीत. ते हिंदूत्व अठरा पगड जातींना सोबत घेऊन जाणारे आहे तर भाजपचे हिंदूत्व मनुवादी आणि घातक माणसा माणसामध्ये अंतर वाढवणारे हिंदूत्व आहे. आज महागाईचा प्रश्न आहे. महिलांवरील हल्ला हा प्रश्न आहे. एकट्या महाराष्ट्रामध्ये सहा महिन्यांमध्ये ४ हजारांहून अधिक मुलीं पळवल्या गेल्या. ज्या राज्यात महिलांना सुरक्षित नाहीत. मुलींना सरंक्षण मिळत नाही.. त्यांना काय अधिकार आहे राज्य, चालवण्याचा, असा सवाल करत हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारे आहे… त्यामुळे या लोकांवर भरोसा ठेवणे योग्य नाही. त्यांना सत्तेपासून बाजूला करणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शक्तिशाली करणे हा एकमेव पर्याय आहे. आमदार, येतात आमदार आणताही येतात, असेही पवारांनी स्‍पष्‍ट केले.

कोल्हापूरमधील दंगलीमागे कोण, हे जगाला माहीत

आम्‍ही शाहू महाराजांचे कोल्हापूर म्हणतो, तिथे दंगल झाली. या दंगलीमध्ये कोण होते हे संपूर्ण जगाला माहीत आहे. जिथे आपली सत्ता नाही त्या ठिकाणी समाजा-समाजांतील वातावरण बिघडवायचे आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो का बघायचे, अशी भूमिका त्यांनी घेतली. जो समाजा- समाजांमध्ये अंतर वाढवतो, समाजाच्या ऐक्याला तडा लावतो तो राष्ट्रप्रेमी असू शकत नाही. त्यामुळे जे राष्ट्रप्रेमी नाहीत त्यांच्यासोबत जाण्याची भूमिका आम्ही घेणार नाही, असेही त्‍यांनी ठणकावले.

घड्याळ चिन्ह जाऊ देणार नाही!

माझ्या राजकीय जीवनात अनेक निवडणुका लढलो आहे. कुणी काही सांगत असेल की, चिन्ह आम्ही घेऊन जाऊ; पण घड्याळ हे चिन्ह जाणार नाही, जाऊ देणार नाही. घड्याळपण चिन्ह घेऊन जात असाल, तर कोणतंही चिन्ह असूद्या, जोपर्यंत सामान्य माणसाच्या अंत:करणात त्या पक्षाचा विचार आणि कार्यकर्त्याची भूमिका चोखंदळ आहे, तोपर्यंत काही चिंता करण्याचं कारण नाही. त्यांना माहीत आहे आपले नाणे चालणार नाही.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT