Latest

शरद पवार-दिलीप वळसे पाटील येणार आमनेसामने

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विद्यमान सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील येत्या 12 ऑगस्टला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये (व्हीएसआय) कार्यक्रमाच्या निमित्ताने समोरासमोर येणार आहेत. वळसे पाटील यांनी अजित पवार यांच्यासमवेत पक्ष सोडल्यानंतर हे दोन नेते समोरासमोर प्रथमच येत आहेत. या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तसेच आमदार जयंत पाटील हेदेखील उपस्थित राहणार आहेत. पवार यांच्यासमोर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही एकाच व्यासपीठावर समोरासमोर येण्याचे टाळले होते. त्यामुळे व्हीएसआयच्या कार्यक्रमात वळसे पाटील काय करणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्याच्या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार उपस्थित होते. मात्र, अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासमोर येण्याचे टाळले होते. त्याबाबत सगळीकडे चर्चा झाली होती. मांजरी येथील व्हीएसआयच्या मुख्यालयात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्लीच्या वतीने 12 ऑगस्ट रोजी सहकारी, खासगी साखर कारखान्यांचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक व संबंधित अधिकार्‍यांसाठी तांत्रिक चर्चासत्र तेथे आयोजित करण्यात आले आहे.

ऊस स्वच्छतेच्या यांत्रिक प्रणालीचे तंत्रज्ञान व बायो सीएनजी या नव्या तंत्रज्ञानाबद्दलचे सादरीकरण या वेळी होणार आहे. व्हीएसआयचे अध्यक्ष शरद पवार असून, उपाध्यक्ष सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आहेत. महत्त्वाचे म्हणजे दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचे अतिशय विश्वासू सहकारी म्हणून परिचित होते.

दरम्यान, शेतातून तोड होऊन गाळपासाठी जो ऊस येतो, त्यासोबत धसकट, कचरा, माती, वाळू, दगडाचे खडे, उसाची मुळे, पाचटदेखील येते. ते गाळपापूर्वी वेगळे करण्याची सोय नसल्याने ऊस तसाच गाळला जातो. त्यामुळे यंत्रसामग्रीचे नुकसान, गाळप क्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच साखर उतार्‍यावरही त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते.

जून महिन्यात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे ब्राझीलमधील साखर उद्योगाचा अभ्यासदौरा आायोजित करण्यात आला होता. या वेळी जनरल चेन्स दा ब्राझील या कंपनीकडे असलेल्या ऊस स्वच्छता यांत्रिक प्रणाली तंत्रज्ञानाचा वापर होत असलेल्या कारखान्यांना प्रत्यक्ष भेट देण्यात आली. या तंत्राची पाहणी केल्यानंतर ब्राझीलच्या या कंपनीच्या तज्ज्ञ अधिकार्‍यांना भारत भेटीचे निमंत्रण देण्यात आले. मांजरी येथील कार्यक्रमात या कंपनीतर्फे सादरीकरण केले जाणार आहे. त्याचबरोबर बायो सीएनजी या नव्या तंत्रज्ञानाबद्दलचे सादरीकरणही केले जाणार आहे. महासंघाकडून याबाबतची माहिती देण्यात आली.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT