नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : विमानात शंकर मिश्रा या प्रवाशाने महिला सहप्रवाशावर लघुशंका (Shankar Mishra urination case) केल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. या प्रकाराकडे दुर्लक्ष करणे एअर इंडियाला महागात पडले आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) शुक्रवारी एअर इंडियाला नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ३० लाख रुपयांचा दंड ठोठावला. डीजीसीएने विमानाच्या पायलट-इन-कमांडचा परवानादेखील ३ महिन्यांसाठी निलंबित केला आहे. तसेच कामात हयगय केल्याप्रकरणी व कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत एअर इंडियाच्या डायरेक्टर-इन-फ्लाइट सर्व्हिसेसवर ३ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
गेल्या नोव्हेंबरमध्ये न्यूयॉर्क-दिल्ली विमानात शंकर मिश्रा याने एका महिला सहप्रवाशावर लघुशंका केल्याप्रकरणी एअर इंडियाने डीजीसीएला उत्तर सादर केले आहे. एका वृद्ध महिला प्रवासीवर लघुशंका केल्याच्या आरोपावरून एअर इंडियाने शंकर मिश्रा याच्यावर चार महिन्यांची बंदी घातली आहे. एअरलाइनने या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल दिलेला आहे. एअर इंडियाने सुरुवातीला आरोपी शंकरला ३० दिवसांसाठी प्रवास करण्यावर बंदी घातली आहे. तसेच ही परिस्थिती हाताळण्यात ज्या चुका केलेल्या आहेत त्याची चौकशी करण्यासाठी अंतर्गत समिती स्थापन केली आहे.
विमान प्रवासात नियामक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल संबंधितांवर कारवाई का केली जाऊ नये, अशी विचारणा करत ६ जानेवारी रोजी डीजीसीएने एअर इंडियाचे व्यवस्थापक, एअर इंडियाच्या इन-फ्लाइट सर्व्हिसेसचे संचालक आणि त्या विमानातील सर्व पायलट आणि केबिन क्रू मेंबर्स यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
विमानात घडलेल्या घटनेचे तथ्य शोधण्यासाठी डीजीसीएने एअर इंडियाकडून घटनेचा तपशील मागवला होता. त्यात प्रथमदर्शनी असे दिसून आले की विमानातील मद्यधुंद प्रवाशाला हाताळताना संबंधित तरतुदींचे पालन केले गेले नाही.
७ जानेवारी रोजी आरोपी शंकर मिश्रा याला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. ४ जानेवारी रोजी पीडित महिलेच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम २९४, ३५४, ५०९, ५१० आणि विमान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. ७ जानेवारी रोजी, दिल्ली पोलिसांनी शंकर मिश्रा याला बंगळूर शहरातील संजय नगर भागातून अटक केली, जिथे स्थानिक पोलिसांनी दिल्ली पोलिसांना मदत केली.
गेल्या आठवड्यात १३ जानेवारी रोजी आरोपी शंकर मिश्रा याने दिल्लीतील न्यायालयात सांगितले होते की, आपण हे आक्षेपार्ह कृत्य केले नाही. तसेच महिलेने स्वतःवर लघुशंका केल्याचा आरोप त्याने केले. या कथित घटनेवरून काही सहप्रवाशांनी आरोपीचा निषेध केला आणि घटनेबाबत पीडितेसोबत आरोपीचे व्हॉट्सअॅप मेसेज केले असले तरी, ही घटना घडलीच नसल्याचा दावा त्याच्या वकिलाने केला. (Shankar Mishra urination case)
हे ही वाचा :