Latest

Sensex Nifty Today | बजेटनंतर एक दिवसानी शेअर बाजारात जल्लोष! सेन्सेक्स १,४०० अंकांनी वाढला, ‘हे’ ३ घटक ठरले महत्त्वाचे

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : अंतरिम अर्थसंकल्पाच्या दिवसाच्या घसरणीतून सावरत शुक्रवारी भारतीय शेअर बाजाराने मोठी उसळी घेतली. सकाळी पावणेबाराच्या सुमारास सेन्सेक्सने तब्बल १,४०० अंकांनी वाढून ७३ हजारांच्या अंकाला स्पर्श केला. तर निफ्टीने ४०० अंकांच्या वाढीसह २२,१०० वर व्यवहार केला. त्यानंतर दुपारच्या व्यवहारात सेन्सेक्स ७२,४०० च्या खाली आला. तर निफ्टी २१,८५० वर आला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या भाषणानंतर अंतरिम अर्थसंकल्पावर अधिक स्पष्टता आल्याने बाजाराने अर्थसंकल्पीय घोषणांवर सकारात्मक प्रतिसाद दिला.

शेअर बाजार खुला होताच सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने तब्बल ८४१ अंकांनी वाढून ७२,४०० पार झाला होता. तर निफ्टीने २५० अंकांनी वाढून २१,९४० चा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर ही तेजी वाढत गेली. आशियाई बाजारातून सकारात्मक संकेत तसेच बँक आणि आयटी शेअर्समधील मजबूत वाढीमुळे भारतीय बाजारातील निर्देशांक शुक्रवारी हिरव्या रंगात उघडले. (Sensex Nifty Today)

सेन्सेक्स आज ७१,९७७ वर खुला झाला. त्यानंतर त्याची तेजी वाढत गेली. सेन्सेक्सवर पॉवर ग्रिड, इन्फोसिस, एनटीपीसी, टेक महिंद्रा, टीसीएस, विप्रो हे शेअर्स टॉप गेनर्स आहेत. इतर सर्व निर्देशांकही हिरव्या रंगात रंगले.

निफ्टीवर बीपीसीएल, पॉवर ग्रिड, अदानी पोर्ट्स, ओएनजीसी, इन्फोसिस हे सर्वाधिक वाढले आहेत. तर आयशर मोटर्स, एचडीएफसी लाईफ हे शेअर्स घसरले.

निफ्टी बँक १ टक्क्याने वाढून ४६,८०० पार झाला. निफ्टी बँकमध्ये पीएनबीचा शेअर टॉप गेनर आहे. त्यापाठोपाठ आयसीआयसीआय बँक, फेडरल बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, बंधन बँक यांचे शेअर्सही वधारले आहेत.

Paytm ला सलग दुसऱ्या दिवशी फटका

पेटीएमची मूळ कंपनी वन ९७ कम्युनिकेशन्सचे शेअर्स कालच्या २० टक्क्यांच्या घसरणीनंतर बीएसईवर आज आणखी २० टक्क्यांनी खाली येऊन ४८७ रुपयांवर आला. (One97 Communications Share Price) रिझर्व्ह बँक इंडियाने (RBI) पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन क्रेडिट आणि डिपॉझिट ऑपरेशन्स, टॉप-अप्स, फंड ट्रान्सफर आणि इतर बँकिंग ऑपरेशन्स फेब्रुवारी अखेरीस थांबवण्यास सांगितल्यानंतर वन ९७ कम्युनिकेशन्सचे शेअर्स काल २० टक्क्यांच्या घसरणीसह लोअर सर्किटमध्ये गेले होते. आज पुन्हा हा शेअर्स २० टक्क्यांनी घसरला.

अंतरिम बजेट

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या भाषणानंतर अंतरिम अर्थसंकल्पावर अधिक स्पष्टता आल्याने बाजाराने अर्थसंकल्पीय घोषणांवर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

रिलायन्स तेजीत

इंडेक्स हेवीवेट रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) चा शेअर्स सकाळच्या व्यवहारात ३ टक्क्यांनी वाढून २,९४० रुपयांवर जात ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला.

जागतिक बाजार

गुरुवारी देशांतर्गत निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी कमी पातळीवर बंद झाले होते. यूएस फेडने व्याजदर जैसे थे कायम ठेवून लवकर दर कपात करणार नसल्याचे संकेत आहे. यामुळे जागतिक भावनावर गुरुवारी त्याचा परिणाम दिसून आला होता. पण रोजगाराच्या अहवालांवर गुंतवणूकदारांनी लक्ष केंद्रित केल्यामुळे गुरुवारी अमेरिकेच्या बाजारातील निर्देशांक वाढून बंद झाले. डाऊ जोन्स ०.९७ टक्के, एस अँड पी १.२५ टक्के आणि नॅस्डॅक कंपोझिट १.३० टक्क्यांनी वाढला. आशियाई बाजारावर नजर टाकल्यास जपानचा निक्केई, हाॅंगकाॅंगचा हॅंग सेंगही तेजीत आहेत. जपानचा निक्केई २२५ निर्देशांक ०.७८ टक्क्यांनी तर हाँगकाँगचा हँग सेंग ०.६० टक्क्यांनी वर होता. दरम्यान, चीनचा शांघाय कंपोझिट ०.७२ टक्क्यांनी घसरला आहे.

हे ही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT