Latest

Stock Market crash | सेन्सेक्स ७०० अंकांनी घसरला, क्षणात उडाले ४.८५ लाख कोटी

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी (दि.१३) मतदान सुरु असताना दुसरीकडे शेअर बाजारात अस्थिरता वाढली. त्यात परदेशी गुंतवणूकदारांकडून होत असलेली विक्री आणि देशांतर्गत महागाईची आकडेवारी जाहीर होण्यापूर्वी भारतीय शेअर बाजारात सोमवारी मोठी घसरण झाली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स तब्बल ७०० अंकांनी घसरून ७२ हजारांच्या खाली आला. तर निफ्टी २०० हून अधिक घसरून २१,८४० वर आला.

ऑटो, कन्झ्यूमर ड्यूराबेल्स आणि मेटल शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली. सुरुवातीच्या या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना ४.८५ लाख कोटींचा फटका बसला. सोमवारी १३ मे रोजी बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३९१.७५ लाख कोटी रुपयांवर आले. याआधी १० मे रोजी ते ३९६.६ लाख कोटींवर होते.

सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सवर टाटा मोटर्स, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, मारुती, एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडसइंड बँक आणि पॉवर ग्रिड हे शेअर्स सर्वाधिक घसरले. तर एशियन पेंट्स, टीसीएस या शेअर्समध्ये किरकोळ वाढ दिसून येत आहे. बीएसई मिडकॅप १.५ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप १.६ टक्क्यांनी घसरला आहे.

एनएसई निफ्टीवर टाटा मोटर्सचा शेअर्स टॉप लूजर ठरला. हा शेअर्स ८ टक्क्यांनी घसरून ९५७ रुपयांवर व्यवहार करत आहे. त्याचसोबत बीपीसीएल, हिरो मोटोकॉर्प, ओएनजीसी, कोल इंडिया हे शेअर्सही २ ते ३ टक्क्यांनी घसरले आहेत.

बँक निफ्टी, फायनान्सियल सर्व्हिसेस हे निर्देशांकही घसरले आहेत.

परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा मारा

परदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय बाजारात विक्रीचा सपाटा सुरुच आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी शुक्रवारी २,११८ कोटी रुपयांचे भारतीय शेअर्स विकले तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी २,७१० कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. गेल्या २८ ट्रेडिंग सत्रांपैकी २३ सत्रांमध्ये परदेशी गुंतवणूकदार केवळ विक्रेते राहिले आहेत.

हे ही वाचा ;

SCROLL FOR NEXT