पुढारी ऑनलाईन : जागतिक सकारात्मक संकेतांमुळे आज शुक्रवारी शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी खरेदीचा मूड कायम राहिला. आज सेन्सेक्स २४१ अंकांनी वाढून ७१,१०६ वर बंद झाला. तर निफ्टी ९४ अंकांनी वाढून २१,३४९ वर गेला. विशेष म्हणजे आजच्या ट्रेडिंग सत्रात आयटी, मेटल, फार्मा आणि रियल्टी क्षेत्रातील तेजीमुळे बाजाराला सपोर्ट मिळाला. (Stock Market Closing Bell)
बँका वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक वाढून बंद झाले. ऑटो, कॅपिटल गुड्स, हेल्थकेअर, ऑईल आणि गॅस प्रत्येकी १ टक्क्याने, तर आयटी, मेटस आणि रियल्टी प्रत्येकी २ टक्क्यांनी वाढले. बीएसई (BSE) मिडकॅप निर्देशांक ०.७ टक्के आणि स्मॉलकॅप १ टक्क्याने वधारला.
संबंधित बातम्या
सेन्सेक्स आज ७१,०४५ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ७१,२५९ पर्यंत वाढला. सेन्सेक्सवर विप्रोचा शेअर टॉप गेनर ठरला. हा शेअर आज ६.८० टक्क्यांनी वाढून ४६३ रुपयांवर पोहोचला. एचसीएल टेक, टाटा मोटर्स, मारुती, टेक महिंद्रा, टाटा स्टील हे शेअर्स प्रत्येकी २ टक्क्यांनी वाढले. इन्फोसिस, जेएसडब्ल्यू स्टील, एलटी, एशियन पेंट्स, नेस्ले इंडिया हे शेअर्स १ टक्क्यांहून अधिक वाढले. दरम्यान, बजाज फायनान्स, एसबीआय, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक हे शेअर्स घसरले.
एनएसई निफ्टी ५० वर विप्रोचा शेअर ७ टक्क्यांनी वाढला. निफ्टीवरील टॉप गेनर्समध्ये विप्रोसह एचसीएल टेक, टेक महिंद्रा, हिंदाल्को, मारुती या शेअर्सचा समावेश होता. तर ग्रासीम, एसबीआय लाईफ, एसबीआय, बजाज फायनान्स हे शेअर्स घसरले. (Stock Market Closing Bell)
आज रोजी फार्मा आणि डायग्नोस्टिक कंपन्यांचे काही शेअर्स १३ टक्क्यांपर्यंत वाढले. देशातील काही भागांत कोरोनाच्या नवीन प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर फार्मा शेअर्स वधारले आहेत. देशात JN.1 नावाच्या नवीन सब-व्हेरिएंटचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे एका दिवसांत ६४० कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. ज्यामुळे एकूण सक्रिय प्रकरणांची संख्या २,९९७ झाली. या पार्श्वभूमीवर विशेषतः पिरामल फार्माचे शेअर्स ८ टक्क्यांनी वाढून १४० रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत. AstraZeneca फार्मा शेअर्स १३ टक्क्यांनी वाढून ५,४०० रुपयांच्यावर पोहोचला. (AstraZeneca Pharma)
फूड आणि ग्रॉसरी डिलिव्हरी कंपनी Zomato चे शेअर्स आज बीएसईवर सुमारे २.५ टक्क्यांनी वाढून १३०.६५ रुपयांच्या पातळीवर पोहोचले. ई-कॉमर्स शिपिंग स्टार्टअप शिपरॉकेट अधिगृहण करणार असल्याच्या वृत्तादरम्यान कंपनीच्या व्यवस्थापनाने हे स्पष्ट केले आहे की त्यांचा विद्यमान व्यवसायांच्या पलीकडे जाण्याचा सध्यातरी विचार नाही. (Zomato Share Price) पण ही तेजी अधिक वेळ राहिली नाही. दुपारच्या व्यवहारात झोमॅटोचे शेअर १२७ रुपयांवर आला होता.
आयकर विभाग पॉलीकॅब कंपनीच्या ५० ठिकाणी झाडाझडती घेत असल्याच्या वृत्तामुळे केबल्स आणि वायर्स उत्पादक पॉलीकॅबचे शेअर्स शुक्रवारी ४ टक्क्यांहून अधिक घसरले. आयकर विभागाची तपास शाखा मुंबईतील पॉलीकॅब इंडियाशी संबंधित जवळपास ५० ठिकाणी झाडाझडती घेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर बीएसईवर हा शेअर दिवसाच्या निचांकी ५,३५१ रुपयांवर आला. (Polycab India Share Price)