पुढारी ऑनलाईन : दोन दिवसांच्या तेजीनंतर भारतीय शेअर बाजारात आज शुक्रवारी अस्थिरता दिसून आली. सेन्सेक्स १८७ अंकांनी घसरून ६५,७९४ वर बंद झाला. तर निफ्टी ३३ अंकांच्या घसरणीसह १९,७३१ वर स्थिरावला. विशेषतः रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ग्राहक कर्ज देण्याचे नियम कडक केल्याने फायनान्सियल शेअर्संना मोठा फटका बसला.
बँक निफ्टी १.३१ टक्के घसरून ४३,५८३ पर्यंत खाली आला. निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस ०.९० टक्के घसरून १९,५५४ वर आला. पीएसयू बँक आणि निफ्टी प्रायव्हेट बँक निर्देशांकही घसरला. दरम्यान, ऑटो, कॅपिटल गुड्स, एफएमसीजी, फार्मा आणि रियल्टी प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी वाढले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक हिरव्या चिन्हात बंद झाला.
संबंधित बातम्या
सेन्सेक्सवर काय स्थिती?
सेन्सेक्सवर एसबीआय, अॅक्सिस बँक, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स हे शेअर्स टॉप लूजर्स ठरले. तर एलटी, हिंदुस्तान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया, पॉवर ग्रिड, एम अँड एम हे शेअर्स वाढले.
निफ्टी ५० वर एसबीआय, ॲक्सिस बँक, ओएनजीसी, बजाज फायनान्स, बीपीसीएल हे घसरले. तर एसबीआय लाईफ, अपोलो हॉस्पिटल, एचडीएफसी लाईफ, हिरो मोटोकॉर्प, बजाज ऑटो हे वधारले.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्डसाठी नियम कडक केल्यानंतर बँकिंग आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांच्या (NBFC) शेअर्सवर मोठा परिणाम जाणवला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँका आणि एनबीएफसीच्या ग्राहक क्रेडिटच्या एक्सपोजरवरील जोखीम भार २५ टक्क्यांनी वाढवला आहे. ग्राहक कर्जावर १०० टक्के जोखीम भार होता. जो आता १३५ टक्के करण्यात आला आहे. यामुळे पेटीएम, बजाज फायनान्स आणि एसबीआय कार्डस याचे शेअर्स ७ टक्क्यांपर्यंत घसरले.
एसबीआय कार्डचा शेअर ७ टक्क्यांपर्यंत घसरून ७२० रुपयांवर आला. बजाज फायनान्स ३ टक्के घसरून ७,१२२ रुपयांवर, तर पेटीएमचा शेअर ४ टक्क्यांनी घसरून ८७० रुपयांवर आला. त्यानंतर पेटीएम (Paytm) ची पेरेंट कंपनी One 97 Communications Limited चा शेयर सावरला आणि तो ८८९ रुपयांवर गेला. तर बजाज फायनान्सचा शेअर ७,२२१ रुपयांवर स्थिरावला. आयडीएफसी फर्स्ट बँक, पीएनबी, अॅक्सिस बँक, एसबीआय आणि बंधन बँक हे बॅंकिंग शेअर्स घसरले.