खानिवडे, पुढारी वृत्तसेवा : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खानिवडे उड्डाण पुलावर आज (दि.२) सकाळी दुभाजकावरुन दुसऱ्या लेनमध्ये पोहोचलेल्या स्कॉर्पिओने समोरुन येत असलेल्या कंटेनरला धडक दिली. या अपघातात स्कॉर्पिओ चालक जागीच ठार झाला. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस आणि मांडवी पोलिसांनी तात्काळ घटना स्थळी दाखल होत मदतकार्य केले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 10 च्या सुमारास जी जे 01 के सी 6445 क्रमांकाची स्कॉर्पिओ मुंबईकडून गुजरातकडे जात होती. खानिवडे उड्डाण पुलाच्या उतारावर स्कॉर्पिओचा पुढील उजवा टायर फुटल्याने गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले. गाडी दुभाजक ओलांडून मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनरला धडकली. धडक इतकी जोरात होती की, स्कॉर्पिओच्या पुढील भागाचा चक्काचूरा झाला. तर खडी घेऊन जाणारा कंटेनर पलटी झाला. यामध्ये स्कॉर्पिओतील चालकाचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर मुंबई मार्गावरील वाहतूक थांबली होती. पोलिसांनी वाहतूक उड्डाण पुलाच्या खालून सुरू करून गाडीत अडकलेल्या चालकाला क्रेन व ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढले.
हेही वाचा :