Latest

सात महिन्याच्या लेकराला वाचवण्यासाठी बिबट्यासमोर ‘ती’ झाली वाघीण

अमृता चौगुले

मंचर : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे फुटाणे मळा येथे मेंढपाळाच्या सात महिन्याच्या मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना बुधवारी( दि. 11) पहाटे घडली आहे. या घटनेत मुलाच्या आईने प्रसंगावधान दाखवत बिबट्याच्या तोंडातून बाळाला ओढत मुलाचे प्राण वाचवले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की थोरांदळे (ता. आंबेगाव) येथील फुटाणे मळा येथे सुखदेव फुटाणे यांच्या शेतात धोंडीभाऊ करगळ या मेंढपाळाचा वाडा बसलेला होता. मेंढपाळ धोंडीभाऊ करगळ यांची पत्नी सोनल करगळ ही तिचा सात महिन्याचा मुलगा देवा याला घेऊन वाड्याचे शेजारीच बाहेर झोपली होती.

संबंधित बातम्या :

पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास मुलाचा हात अंथरूणाचे बाहेर पडला होता. त्यावेळी बाजूलाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने मुलाचा हात तोंडात धरत ओढण्याचा प्रयत्न केला त्यावेळी सोनल करगळ यांना जागा आली असता तिने मुलाला ओढत बिबट्याला प्रतिकार सुरू केला तिने एका हाताने बिबट्याचे तोंड दाबण्याचा प्रयत्न करत एका हाताने मुलाला वाचवण्यासाठी धडपड सुरू केली व जोर जोरात आरडा ओरडा केला. त्यावेळी तिच्या कुटुंबातील सदस्य बाहेर येत त्यांनी जोर जोरात आरडाओरडा केला त्यावेळी बिबट्या पळून गेला या हल्ल्यात सात महिन्याचा मुलगा देवा धोंडीभाऊ करगळ याच्या हाताला दात लागला असून पोटाला नख्या लागल्या आहेत. घटनेची माहिती कळताच स्थानीक शेतकरी सागर विश्वासराव, प्रकाश फुटाणे यांनी मेंढपाळ कुटुंब यांना धीर देत मुलाला मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या मुलावर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय मंचर येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान पहाटे घडलेल्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले . रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या बाळाची व त्याच्या आईची वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांनी भेट घेत चौकशी केली आहे.

दोन दिवसापूर्वीच जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका लहानग्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आंबेगाव तालुक्यातही बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने परिसरात पिंजरा लावुन बिबट्यास जेरबंद करावे अशी मागणी स्थानिक शेतकरी करत आहे.

मेंढपाळांनी उघड्यावर झोपू नये

थोरांदळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात सात महिन्याचे बाळ जखमी झाले असून सुदैवाने बाळ सुखरूप आहे. त्याचे आई व ते बाहेर उघड्यावर झोपले असताना ही घटना घडली आहे. मेंढपाळ हे उघड्यावर झोपतात .आपल्या भागात बिबट प्रवण क्षेत्र जास्त आहे. त्यामुळे मेंढपाळांनी उघड्यावर झोपताना काळजी घ्यावी वाड्याचे कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी समूहाने रहावे. रात्रीचे वेळी जागून आळीपाळीने वाड्यावर लक्ष ठेवावे ज्या ठिकाणी त्यांचा वाडा बसला आहे त्या ठिकाणी मोठी लाईट लावावी. आवाज करणारे यंत्र बसवावे असे आवाहन मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT