Latest

स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरी होणार : मुख्यमंत्र्यांची घोषणा

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती आता  'स्वातंत्र्यवीर गौरव दिन' म्हणून साजरा होणार आहे. यासंदर्भातील घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटच्‍या माध्‍यमातून आज (दि.११) केली.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती २८ मे  रोजी साजरी होते . हा दिवस 'वीर स्‍मरण दिन' म्हणून साजरा करावा, अशी मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती.

मंत्री उदय सामंत यांनी केली होती मागणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्‍या ट्विटमध्‍ये म्‍हटलं आहे की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्रउन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांची देशभक्ती,धैर्य,प्रगतीशील विचारांना पुढे नेण्यासाठी, त्यामाध्यमातून त्यांना अभिवादन करण्यासाठी वीर स्‍मरण दिन, म्‍हणून साजरा करावा, अशी मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती.

सावरकरांच्‍या विचारांच्या प्रसारासाठी विविध कार्यक्रमांचे होणार आयोजन

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा २८ मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्‍या ट्विटमध्‍ये म्‍हटलं आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर : उदय सामंत यांची मागणी

उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांना मागणी केली होती, त्यामध्ये त्यांनी म्हंटल आहे की,

प्रति, मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. आदरणीय महोदय, भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी अनेक समाजसुधारक, लेखक, कवी, राजकीय नेते व स्वातंत्र्यसैनिकांचे मोठे योगदान आहे. त्यात क्रांतिकारी स्वातंत्र्य सैनिक वीर सावरकर यांचे महत्वाचे योगदान आहे. वीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख नेत्यांपैकी एक होते. ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी अंदमानमधील सेल्युलर जेलमध्ये अनेक वर्षे काढली. त्यांची देशभक्ती आणि देशासाठीचा त्याग आजही तरुणांना प्रेरणा देत आहे. वीर सावरकरांनी हिंदुत्वाच्या कल्पनेचा प्रचार केला आणि अखंड हिंदू अस्मितेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांचे लेखन आणि तत्वज्ञान आजही राष्ट्रीय राजकारणावर प्रभाव टाकत आहे. वीर सावरकरांनी अस्पृश्यता निर्मूलन, हिंदीचा प्रचार यासारख्या सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला आणि जातिव्यवस्थेवर जोरदार टीका केली आणि हिंदू समाजाला एकत्र आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींमध्ये वीर सावरकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी महाराष्ट्रीय अस्मितेला आकार देत मराठा इतिहासाचा गौरव अधोरेखित केला. महाराष्ट्रातील आदर्श महापुरूष म्हणून ते आजही आदरणीय आहेत. कविता, इतिहास, धर्म आणि संस्कृतीवरील पुस्तकांच्या रूपात त्यांची साहित्यकृती त्यांच्या ज्ञानाची आणि बुद्धीची खोली दर्शवते. त्यांची अनेक कामे प्रभावशाली आहेत. त्यांच्या अतुलनीय योगदानाला योग्य श्रद्धांजली द्यायची असेल आणि तरुण पिढीला त्यांच्या देशभक्ती, धैर्य आणि प्रगतीशील विचारांना पुढे न्यायचे असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस साजरा करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांचा विचार करुन स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा २८ मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करुन, विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करुन साजरा करण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात याव्यात, तसेच हा जन्मदिवस "वीर स्मरण दिन" म्हणून साजरा करावा, ही नम्र विनंती.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT