Latest

Sattvic-chirag : सात्त्विक-चिराग जोडी पुन्हा चॅम्पियन

Arun Patil

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आशियाई चॅम्पियन सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी (Sattvic-chirag) या जोडीने रविवारी आणखी एक धमाकेदार कामगिरी केली. या जोडीने पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या इंडोनेशियाच्या फजर अल्फियान आणि मोहम्मद रियान अर्दियांटो या जोडीचा 17-21, 21-13, 21-14 असा चुरशीच्या लढतीत पराभव करून कोरिया ओपनचे विजेतेपद पटकावले आहे.

दोघांच्या कारकिर्दीतील हे तिसरे सुपर 500 विजेतेपद आहे. यापूर्वी या दोघांनी 2019 मध्ये थायलंड ओपन, 2म022 मध्ये इंडिया ओपन जिंकली आहे. या जोडीने प्रथमच कोरिया ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. (Sattvic-chirag)

भारतीय जोडीने पहिला गेम गमावला. मात्र, या जोडीने हार मानली नाही आणि पुढच्या दोन गेममध्ये दमदार खेळ दाखवत सामना जिंकून जेतेपदावर नाव कोरले. उपांत्य फेरीत या जोडीने जगातील दुसर्‍या क्रमांकाची जोडी असलेल्या चीनच्या लियांग वेई केंग आणि वांग चांग या जोडीचा पराभव केला. अंतिम फेरीत पण भारतीय जोडीने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत विजेतेपद पटकावले. या विजयानंतर दोघांनीही जल्लोष केला आणि प्रत्येक वेळी प्रमाणेच जोरदार डान्स केला. दोघांनी गंगनम स्टाईलमध्येही डान्स केला.

या दोघांच्या जोडीने भारताला अनेक यश मिळवून दिले आहेत. गतवर्षी सात्त्विक आणि चिरागने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. याशिवाय थॉमस कपमध्येही या जोडीला सुवर्ण जिंकण्यात यश आले होते.

या जोडीने जागतिक चॅम्पियनशिपमध्येही चमत्कार केले आणि कांस्यपदक जिंकण्यात यश मिळवले. याशिवाय सय्यद मोदी, स्विस ओपन, थायलंड ओपन, इंडिया ओपन, सुपर 750 फ्रेंच ओपन ही जेतेपदे त्यांच्या नावावर होती.

हेही वाचा…

SCROLL FOR NEXT