Pakistan A vs India A : पाकिस्तान ‘अ’ संघ आशिया चॅम्पियन | पुढारी

Pakistan A vs India A : पाकिस्तान ‘अ’ संघ आशिया चॅम्पियन

कोलंबो, वृत्तसंस्था : पाकिस्तान ‘अ’ संघाने इमर्जिंग आशिया चषक फायनलमध्ये (Pakistan A vs India A) भारत ‘अ’ संघावर 128 धावांनी विजय मिळवून स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. अम्पायरच्या सुरुवातीच्या दोन चुकीच्या निर्णयामुळे भारताचे दोन फलंदाज माघारी परतले. तिथे भारतीय संघावर दडपण वाढले आणि भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो टीम इंडियाला महागात पडला. पाकिस्तान ‘अ’ संघाने 50 षटकांत 8 बाद 352 धावा केल्या. याचा पाठलाग करताना भारत ‘अ’ संघ 224 धावा करू शकला.

साई सुदर्शन व अभिषेक शर्मा यांनी आक्रमक सुरुवात करताना 8.3 षटकांत 64 धावा फलकावर चढवल्या. अर्शद इक्बालच्या गोलंदाजीवर सुदर्शन (29) झेलबाद झाला; परंतु हा चेंडू नो बॉल असल्याचे स्पष्ट दिसत होते. निकिन जोस (11) याचीही विकेट अम्पायरने ढापली. मोहम्मद वासीमच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक मोहम्मद हॅरीसने झेल घेतला; परंतु चेंडू अन् जोसच्या बॅटचा काहीच संपर्क झालेला नव्हता. अभिषेक शर्मा व कर्णधार यश धूल यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अभिषेकने (61) अर्धशतकी खेळी केली; परंतु सुफियान मुकीमच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. निशांत सिंधूही (10) लगेच माघारी परतला.

ज्यावर सर्व भिस्त होती, तो यश धूलही पुढच्या षटकात झेलबाद झाला. सुफियान मुकीमने 39 धावांची खेळी करणार्‍या यशला बाद केले अन् भारताचा निम्मा संघ 159 धावांत तंबूत परतला. इथून भारताचा डाव गडगडला. ध्रुव जुरेल (9), रियान पराग (14) व हर्षिल राणा (13) झटपट माघारी परतले. मेहरान मुमताझने यापैकी दोन विकेटस् घेतल्या, तर मुकीमने हर्षितला बाद केले. राजवर्धन हंगरगेकरने (11) थोडा संघर्ष दाखवला; परंतु अर्शद इक्बालने त्याला बाद केले. भारताचा संपूर्ण संघ 40 षटकांत 224 धावांवर तंबूत परतला. पाकिस्तानने 128 धावांनी विजय मिळवून सलग दुसर्‍यांदा हा चषक उंचावला.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने भारताला सामना जिंकण्याचे मोठे लक्ष्य दिलेे. त्यांनी 50 षटकांत आठ गडी बाद 352 धावा केल्या. पाकिस्तानकडून तय्यब ताहिरने सर्वाधिक 108 धावा केल्या. साहिबजादा फरहानने 65 आणि सॅम अयुबने 59 धावा केल्या. ओमेर युसूफ आणि मुबासिर खान यांनी 35-35 धावांचे योगदान दिले. मोहम्मद वसीम ज्युनियर 17 धावा करून नाबाद राहिला. मेहरान मुमताजने 13 धावा केल्या. मोहम्मद हारिस दोन धावा करून बाद झाला. कासिम अक्रम खातेही उघडू शकला नाही. सुफियान मुकीमने नाबाद चार धावा केल्या. भारत ‘अ’ संघाकडून राजवर्धन हंगरगेकर आणि रियान पराग यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. हर्षित राणा, मानव सुथार आणि निशांत सिंधू यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

नो बॉलवर विकेट (Pakistan A vs India A)

हंगरगेकरने करून दिली बुमराहची आठवण

पाकिस्तान ‘अ’ संघाला चांगली सुरुवात मिळाली, पण भारत ‘अ’ संघाचा वेगवान गोलंदाज राजवर्धन हंगरगेकरने सलामीवीर सॅम अयुबला टाकलेल्या नो बॉलने चाहत्यांना चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 मधील बुमराहच्या नो बॉलची आठवण करून दिली. पाकिस्तानी फलंदाजाला जीवदान मिळाल्यानंतर सामन्याचा रंग बदलला.

भारत ‘अ’ विरुद्ध पाकिस्तान ‘अ’ सामन्यात राजवर्धन हंगरगेकर चौथे षटक टाकत होता. त्या षटकातील शेवटचा चेंडू त्याने पाकिस्तानचा सलामीवीर सॅम अय्युबला टाकला. 17 धावांवर फलंदाजी करणार्‍या सॅमच्या बॅटला चेंडू बाहेरच्या बाजूला लागला आणि थेट यष्टिरक्षकाच्या हातात गेला. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी आऊटसाठी जोरदार अपील केले, पण रिप्लेमध्ये राजवर्धनचा पाय लाईनच्या बाहेर जाताना दिसला. त्यानंतर या चेंडूला नो बॉल देण्यात आला आणि सॅमला जीवदान मिळाले. यानंतर सॅमने त्याच्या सलामीच्या फलंदाजासह शानदार शतकी भागीदारी केली.

राजवर्धनच्या या चेंडूवर चाहत्यांना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 च्या अंतिम सामन्याची आठवण झाली. या सामन्यात जसप्रीत बुमराह पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज फखर जमानला गोलंदाजी करत होता. त्याने चेंडू टाकला आणि फखरच्या बॅटची कड घेऊन तो थेट यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीच्या हातात गेला, पण रिप्लेच्या वेळी तो चेंडू नो बॉल देण्यात आला. तसाच प्रकार हंगरगेकरच्या बाबतीत झाला. यानंतर फखर जमान आणि अझहर अली यांनी 128 धावांची सलामी दिली. अंतिम सामन्यात भारताला एकतर्फी पराभवाला सामोरे जावे लागले.

Back to top button