सातारा : पुढारी वृत्तसेवा
राज्याचे गृहमंत्री सातारा जिल्ह्यावर औंध पोलिस ठाण्याचे लॉकअप तोडून पळून गेलेल्या ५ दरोडेखोर प्रकरणी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षकासह चार पोलिस कर्मचार्यांना निलंबित (सस्पेंड) केले. दै. 'पुढारी'ने दि. ११ रोजी 'पोलिसांची अब्रू चव्हाट्यावर..कॅप्टन 'त्यांना' आणा वठणीवर,' असे रोखठोक वृत्त प्रसारीत केल्यानंतर लगेचच 'कॅप्टन इन अॅक्शन' मोडवर आले.
सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत बधे यांच्यासह चार पोलिस कर्मचार्यांना निलंबित केले असून त्यांची प्राथमिक चौकशी (पीई) लावण्यात आली आहे. दि. ९ मे रोजी पहाटे औंध पोलिस ठाण्याचे लॉकअप तोडून पाच अट्टल दरोडेखोर पळाले. या घटनेने परिसरासह जिल्हा हादरुन गेला. दि. ८ व ९ मे रोजी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह अनेक मातब्बर मंत्री जिल्ह्या दौर्यावर होते. यावेळी पोलिसांनी अलर्ट असणे गरजेचे होते. पण, तसे झाले नाही. याचाच गैरफायदा घेत दरोडेखोरांनी लॉकअप तोडून पलायन केले.
या एका घटनेने पोलिस दल कामाला लागले असतानाच दुसरीकडे दि. ९ रोजीच सांयकाळी लोणंद येथील पोलिस हवालदाराने २० हजार रुपयांची लाच स्वीकारली. यामुळे सातारा जिल्हा पोलिस दलाची अब्रूच चव्हाट्यावर आली.
दि. ११ रोजी दै. पुढारीने याबाबत रोखठोक भूमिका घेतली. पोलिस दलातील ज्या ज्या विभागाचा गलथान कारभार सुरु आहे, त्याविषयी पोलिस अधीक्षकांनी कामचुकार करणार्यांना वठणीवर आणण्याची अपेक्षा वृत्ताद्वारे केली. दै. 'पुढारी'च्या या वृत्तानंतरच लगेचच दि. ११ रोजीच एसपी अजयकुमार बन्सल यांनी पाच जणांना निलंबित केले.
सपोनि प्रशांत बधे यांना निलंबित केल्यानंतर त्याठिकाणी सपोनि दत्तात्रय दराडे यांनी प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, एसपी यांच्या या कारवाईनंतर तरी आता जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकारी, कर्मचारी प्रभावीपणे काम करुन गुन्हेगारीला पायबंद घालतील अशी अपेक्षा आहे.