नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा
एक मुखी दत्तासाठी प्रसिद्ध असलेल्या शहादा तालुक्यातील तापी काठावर भरवल्या जाणाऱ्या सारंगखेडा यात्रेला प्रशासनाने कोरोनामुळे फाटा दिला. परंतु राज्यात प्रसिद्ध असलेला तेथील घोडेबाजार यंदा भरवण्यात आला असून कोटीची उलाढाल घडवायला सज्ज झाला आहे. 5 कोटी, 2 कोटी रुपये किंमत सांगितल्या जाणाऱ्या आकर्षक घोड्यांनी या बाजाराकडे चांगलेच लक्ष वेधले आहे.
देशभरात प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा येथील यात्रेत यंदा केवळ अश्व बाजाराला परवानगी मिळाली असून विक्रीसाठी १,११९ आकर्षक घोडे दाखल झाले आहेत. कोरोना महामारीच्या काळामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर शासनाने नियम व अटींच्या अधीन राहून अश्व बाजाराला ही परवानगी दिली आहे. यात्रेत मागील चार दिवसांत १ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज तेथील जाणकारांनी व्यक्त केला आहे.
रावण, रुस्तम, नुकरा आणि बुलंद यासारख्या कोट्यवधी रुपये किमतीच्या घोड्यामुळे यंदाचा घोडेबाजार अधिकच लक्षवेधी ठरला आहे. रावण घोड्याची किंमत पाच कोटी रुपये सांगण्यात येत आहे. रुस्तमची किंमत दीड कोटी रुपये सांगितली जात आहे. रावणचे मालक असद ३ सैयद यांनी एकूण १० घोडे विक्रीसाठी आणले असून त्यातील बुलंद या घोड्याची किमतही १ कोटी रुपये आहे. अन्य घोडे विक्रीच्या माध्यमातून परंपरागत पद्धतीने लाखो रुपयांची उलाढाल चालू आहे.
सारंखेडा येथील फेस्टिवल आयोजक जयपाल रावल व घोडे मालकाने दिलेल्या माहितीनुसार 'रावण' हा घोडा अतिशय आकर्षक मारवाड जातीचा असून त्यांची उंची ६८ इंच आहे. काळ्या रंगाच्या रावण अश्वाच्या कपाळावर पांढरा टिळा आहे. त्याला देवमन, कंठ, कुकड नाळ, नगाडा पुठ्ठा अशी शुभलक्षणे आहेत. यामुळे त्याची कोट्यवधी रुपये किंमत असल्याचे घोडे मालक सैयद यांचे म्हणणे आहे.
हे ही वाचा :