Latest

पिंकीचा विजय असो : संकर्षण कऱ्हाडेचा भाऊ लक्षवेधी भूमिकेत

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

स्टार प्रवाहवर ३१ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या पिंकीचा विजय असो या मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या मालिकेत संकर्षण कऱ्हाडेचा भाऊ अधोक्षज कऱ्हाडे लक्षवेधी भूमिकेत दिसणार आहे. पिंकीचा विजय असो या मालिकेत तो बंटी हे पात्र साकारणार आहे. या भूमिकेसाठी तो खूपच उत्सुक आहे. बंटी हा पिंकीचा अगदी जवळचा मित्र. पहिल्यांदा मैत्री आणि कालांतराने एकतर्फी प्रेम करणारा मस्तमौला तरुण.

या अनोख्या भूमिकेविषयी सांगताना अधोक्षज म्हणाला, 'बंटी हे अतिशय कलरफुल पात्र आहे. आमची पटकथा लेखिका श्वेता पेंडसेने खूप उत्तमरित्या ते मला समजावलं आहे. पिंकीवर मनापासून प्रेम करणारा आणि सतत तिच्यासाठी धडपडणारा असा हा बंटी. मालिकेची टीम खूप भन्नाट आहे. त्यामुळे काम करताना मजा येतेय. आम्ही साताऱ्यातल्या एका गावात काम करतोय. त्यामुळे प्रेक्षकांचाही छान प्रतिसाद मिळतोय. स्टार प्रवाहसोबत याआधी छोटी मालकीण आणि लक्ष्य या मालिकांमध्ये मी काम केलं आहे. त्यामुळे बंटी साकारणं माझ्यासाठी नवं आव्हान असेल.'

आयुष्य भरभरून जगणाऱ्या अतरंगी आणि सतरंगी पिंकीची गोष्ट या मालिकेतून उलगडेल. खाईन तर तुपाशी अश्या ठाम विचारांच्या असणाऱ्या पिंकीला फिल्मी दुनियेचं फार आकर्षण आहे. तिच्या रहाण्यातून, वागण्यातून आणि बोलण्यातून ते प्रकर्षाने जाणवतं. अशी ही स्वप्नाळू पिंकी आपली स्वप्न कशी पूर्ण करते हे मालिकेतून पाहायला मिळेल.

तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका पिंकीचा विजय असो ३१ जानेवारीपासून रात्री ११ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

SCROLL FOR NEXT