Latest

मुख्यमंत्री सुट्टीवर असतील, आम्ही नव्हे – संजय राऊतांचा टोला

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री सुट्टीवर आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षाला सुनावले. त्यावर 'मुख्यमंत्री सुट्टीवर असतील, आम्ही नव्हे. विरोधी पक्ष सुट्टीवर जात नाही', असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर लगावला आहे.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्यांच्या कुटुंबांना सरकारकडून नाहक त्रास दिला जातो. भाजपची अशी ६० ते ७० प्रकरणे आहेत. ती मी हळूहळू बाहरे काढेन. या सर्व प्रकरणाची माहिती मी स्वत: भेटून ईडी आणि सीबीआयला देणार असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. यानंतर किरीट सोमय्या यांनी कोकणातल्या १०० शेल कंपन्या खोट्या असल्याचा दावा येथील एका केंद्रीय मंत्र्यावर केला होता. मग याचे पुढे काय झाले संदर्भात सोमय्या यांनी स्पष्ट करावे नाहीतर हे प्रकरण आम्ही पुढे नेऊ; असे नाव न घेता भाजप मंत्री नारायण राणे यांच्यावर देखील राऊत यांनी भष्ट्राचार प्रकरणी निशाणा साधला आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या भष्ट्राचारी कारवाया या एकतर्फी होत आहेत. त्यामुळे देशभरातील भाजप भष्ट्राचार प्रकरणावर राज्यव्यापी आंदोलन उभे करण्याची गरज आहे. आम्ही ते करत आहोत. यासाठी महाराष्ट्र पुढाकार घेईल हे देखील राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

राहुल कुल यांच्या दबावामुळे कारखान्यात जाण्यास अडवणूक

दौंडमधील-भीमा पाटस कारखान्यात जाताना कलम १४४ लावण्यात आले. तरी देखील कारखान्यात श्रद्धांजली वाहण्यासाठी दौंड गावातील हजारो गावकरी कारखान्याच्या परिसरात हजर राहिले. राहुल कुल यांच्या दबावामुळे कारखान्यात जाण्यास अडवले गेले. तरी देखील अनेक शेतकऱ्यांसह आम्ही कारखान्यात गेलो. त्यामुळे भीमा कारखाना हा नवाज शरीफ यांचा आहे का? कारखान्यात जाण्यास मनाई का करण्यात आली, असा सवाल संजय राऊत यांनी सरकारला केला आहे.

गरज पडल्यास उद्धव ठाकरे देखील 'बारसू'त

बारसूमधील लोकांच्या भावनेचा सरकारने आदर करावा. बारसू प्रकल्पाबाबत आम्ही मागे हटलेलो नाही. विनायक राऊत स्वत: याठिकाणी उपस्थित आहेत. गरज पडल्यास उद्धव ठाकरे देखील बारसूत जातील, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT