पुण्यात एकतर्फी प्रेमातून दुचाकी पेटवणार्‍या दोघांना पोलिसांकडून अटक | पुढारी

पुण्यात एकतर्फी प्रेमातून दुचाकी पेटवणार्‍या दोघांना पोलिसांकडून अटक

येरवडा : पुढारी वृत्तसेवा :  एकतर्फी प्रेमातून दुचाकी पेटवण्याचा गंभीर प्रकार खांदवेनगर लोहगाव येथे सोमवारी घडला. या घटनेत फिर्यादी यांच्या दुचाकीसह इतर दोन दुचाकी जळाल्या असून, याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे.
अटक आरोपींमध्ये श्रीराम भरत गाडगे (वय 19, रा. भाडळे वस्ती, वाघोली ) व गजानन एकनाथ देवक (वय 20, रा. बकोरी फाटा, वाघोली) या दोघांचा समावेश आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खांदवेनगर येथे राहणार्‍या एका तरुणीला श्रीराम गाडगे हा त्रास देत होता. तरुणीच्या वडिलांनी ‘मुली सोबत बोलू नको तिला त्रास देऊ नको‘ असे त्याला सांगितले होते. याचा राग डोक्यात ठेवून आरोपी याने सोमवारी रात्री फिर्यादी यांच्या पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी पेटवून दिली. पोलिस हवालदार सचिन कदम व पोलिस नाईक गिरीश नाणेकर यांनी आरोपीला अटक केली. पुढील तपास पोलिस हवालदार सचिन कदम करीत आहेत.

Back to top button