नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यातील दिग्गज नेते, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यात राजकीय दिलजमाई झाल्याने शिवसेनेत अस्वस्थता असल्याचे दिसून आले आहे. खोतकर शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर खोतकर अजूनही शिवसेनेत आहेत, असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी व्यक्त केला.
दोन दिवसांपूर्वी खोतकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर "दानवेंना गाडल्याशिवाय राहणार नाही असा शब्द त्यांनी दिला होता," असा दावाही राऊत यांनी केला. लोकसभेचा निवडणूक लढवून रावसाहेब दानवे यांना कायमचे घरी बसवू; असा शब्ददेखील त्यांनी दिला होता, असेही ते म्हणाले. जोपर्यंत ते स्वतःहून समोरून सांगत नाहीत तोपर्यंत ते शिवसेनेतच आहेत आणि ते शिवसेना सोडणार नाहीत, असे राऊत म्हणाले.
सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशी संबंधी प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, सोनिया गांधी यांचे वय ७५ आहे. त्या आजारी आहेत. तरीही त्या ईडीचे समन्स आल्याने चौकशीला गेल्या. परंतु, हे राज्यकर्त्यांना शोभा देत नाही. त्यांची घरी जाऊन चौकशी केली असती. हे अमानुष आहे. नॅशनल हेराल्डला एक इतिहास आहे. ही संस्था वाचवण्यासाठी काँग्रेसने किंवा गांधी कुटुंबाने काही प्रयत्न केले असतील तर त्यांना सरकारने पाठिंबा द्यायला हवा. परंतु, त्यातही मनी लॉन्ड्रिंग दिसत असेल तर चुकीचे आहे. देशातील विरोधी पक्ष, नेते, पत्रकार यांचा छळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते लोकशाहीला आणि देशाच्या स्वातंत्र्याला आणि देशाच्या अस्तित्वाला मारक आहे, असे ते म्हणाले.
हे ही वाचा :