खैरे, दानवेंनीच सेनेचे वाटोळे केले; हकालपट्टीनंतर जंजाळ यांनी साधला निशाणा

खैरे, दानवेंनीच सेनेचे वाटोळे केले; हकालपट्टीनंतर जंजाळ यांनी साधला निशाणा

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनीच स्थानिक पातळीवर शिवसेनेचे वाटोळे केले. पक्षसंघटना कायम आपल्याच ताब्यात राहावी यासाठी हे दोघे प्रयत्नशील असतात. त्यांच्या मुलांचे राजकीय भवितव्य वाचविण्यासाठी आधीपासूनच त्यांनी मला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी शनिवारी केला. खैरे यांनी थयथयाट करून युवा सेनेतून आपली हकालपट्टी करायला लावली, असेही जंजाळ म्हणाले.

शिंदे गटात सामील झाल्याने राजेंद्र जंजाळ यांची युवा सेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. या कारवाईनंतर जंजाळ यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन खैरे आणि दानवे यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली. जंजाळ म्हणाले, की युवा सेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचे मला अजिबात दु:ख नाही. कारण खूप आधीपासून माझी घुसमट होत होती. मला पक्षाच्या कार्यक्रमांपासून दूर ठेवण्यात येत होते. खैरे आणि दानवेंनी वेळावेळी मला त्रास दिला, माझे राजकीय अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न केला, तरीही मी सहन करत होतो. मी संधीची वाट पाहत होतो, ती संधी मिळाली. खैरे यांना मी त्यांच्या मुलाचा स्पर्धक वाटत होतो. युवा सेनेचे इतरही अनेक पदाधिकारी मुख्यमंत्री शिंदे यांना भेटायला गेले, परंतु इतरांवर कारवाई झाली नाही. माझ्यावर कारवाई झाली. कालच्या मेळाव्यात खैरे यांनी माझ्या हकालपट्टीची घोषणा केली. नेहमीप्रमाणे जिल्हाप्रमुख दानवे यांनी खैरे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून माझा 'गेम' केला. खैरेंनी थयथयाट करून वरतून माझ्या हकालपट्टीचा आदेश काढायला लावला, असा आरोपही जंजाळ यांनी केला. मी हिंदुत्वाचा 'वॉचमन'मी 'वॉचमन'सारखा आमदार शिरसाट यांच्या कार्यालयात बसलो होतो, असे खैरे यांनी कालच्या मेळाव्यात म्हटले. 'होय, मी हिंदुत्वाचा वॉचमन आहे. राजाबाजार दंगल झाली, तेव्हा खैरे यांच्या पुतण्याचा जीव जायची वेळ आली होती, तेव्हा मीच वॉचमनसारखा पुढे झालो, त्याबद्दल खैरे यांनी माझे आभार मानायला पाहिजे होते,' असेही जंजाळ म्हणाले.

घोडेले सोडले तर दुसरे कोण?

आता माझी शिवसेनेनेच हकालपट्टी केली आहे, त्यामुळे मी शिंदे गटात सर्व शक्तीनिशी काम करणार आहे. मनपा निवडणुकीत सर्वाधिक मते घेऊन निवडून येणारा उमेदवार मी असेन. हवे तर खैरे, दानवे यांनी त्यांची ताकद लावावी, असे आव्हान जंजाळ यांनी दिले. 'सध्या घोडेले सोडले तर शिवसेनेसोबत दुसरे कोणते नगरसेवक आहेत, कोणीही नाही,' असे जंजाळ म्हणाले.

दानवेंनी 'लोकसभे'त गद्दारी केली

लोकसभा निवडणुकीत अंबादास दानवे आणि 52 पदाधिकाऱ्यांनी गद्दारी केली. सोबत राहून पक्षविरोधी काम केले. खैरे यांनी त्या गद्दारांविरोधात थयथयाट केला असता आणि त्यांची हकालपट्टी करायला लावली असती, तर आज खैरे यांचे पक्षातील स्थान उंचावले असते, पण त्यांनी माझ्या हकालपट्टीसाठी प्रयत्न केले, असे जंजाळ म्हणाले. खैरे आणि दानवे या दोघांचे जमत नाही, परंतु राजकीय अस्तित्व धोक्यात येते, तेव्हा तेव्हा ते दोघे एक होतात, असेही जंजाळ यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news