पुढारी ऑनलाईन डेस्क: मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई आणि छगन भुजबळ हे दोन्ही कॅबिनेटमंत्री आमने-सामने आले आहे आहेत. यावरून ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद सुरू आहे. महाराष्ट्रात आरक्षणाच्या प्रश्नावरून कॅबिनेट मंत्री एकमेकांवर धावून जात आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रकाराने संपूर्ण वातावरण बिघडले आहे. आरक्षणावरून कॅबिनेटमध्ये गँगवॉर सुरू असून, मुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांवर नियंत्रण नाही, अशी टीका राऊत यांनी केली आहे. दरम्यान सत्ताधाऱ्यांकडून राज्यात जातीपातीचं विभाजन सुरू असून, राज्यात कमजोर सरकार कार्यरत आहे, असे देखील ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. पत्रकार परिषददरम्यान ते आज (दि.९) माध्यमांशी बोलत होते. ( Sanjay Raut Press)
पुढे बोलताना राऊत म्हणाले, शिवसेनाबाबत निवडणूक आयोगाकडून घेतलेला निर्णय हा केंद्रसरकारच्या दबावाखाली घेण्यात आला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आणि ईडी भाजपचे पोपट असल्याची टीका देखील त्यांनी केली. तसेच सत्ता आणि पैशाच्या जोरावर शिंदे गटाकडून शिवसेनेच्या शाखा घेण्यात येत आहेत. यावरून हे काय मुघलांचे राज्य आहे का? असा सवाल देखील राऊत यांनी केला आहे. ( Sanjay Raut Press)
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार असूनही पक्ष अजित पवार यांना दिला जातो. असे वक्तव्यही संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसंदर्भात केले आहे. राज्यात राजकीय सुडापायी अनेकांवर ईडीकडून कारवाई करण्यात येत आहे. अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यावर ईडीची टांगती टलवार आहे. यावरून भाजप हरते तिथे ईडी जाते असा टोला देखील संजय राऊत यांनी केंद्रातील भाजप आणि राज्यातील युती सरकारला दिला आहे. (Sanjay Raut Press)