कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामातील साखर विक्रीचे अधिकार आम्ही राजू शेट्टी यांनाच देत आहोत, असा टोला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी हाणला. साखर कारखान्यांची कर्जे प्रचंड वाढल्यामुळे कोल्हापूर जिल्हा बँकेचा अध्यक्ष म्हणून मला झोपसुद्धा लागत नाही, असेही ते म्हणाले. जयसिंगपूर येथे मंगळवारी झालेल्या ऊस परिषदेत शेेट्टी यांनी मुश्रीफ यांच्यावर थेट टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
कारखान्यांच्या साखर विक्रीच्या तपासणीसाठी शेट्टी यांनी कोणत्याही कारखान्यात तज्ज्ञ चार्टर्ड अकाऊंटंटचे पथक पाठवावे. त्यांना कागदपत्रे उपलब्ध करून दिली जातील. ती पाहिल्यानंतर शेट्टी यांचा साखर विक्री दराबाबतचा गैरसमज दूर होईल.
शेट्टी यांनी माझे नाव घेतल्यामुळे हा खुलासा करत आहे. यापुढे त्यांना उत्तर देणार नाही, असेही पत्रकात नमूद केले आहे.
महाराष्ट्रातील कोणत्या साखर कारखान्याने प्रतिटन साडेतीन हजार रूपये ऊसदर दिला आहे ते दाखवून द्या. कर्नाटकात प्रतीटन 2,800 ते 2,900 रुपये दराने ऊस घेतला जात आहे. साखर विक्रीमध्ये सभासदांच्या साखरेचा अंतर्भाव आहे. त्यामुळे गेल्या दोन-तीन महिन्यात जो वाढलेला दर आहे तो सरासरीने कमी दिसतो, याचीही शहानिशा शेट्टी यांनी करावी, असे पत्रकात म्हटले आहे.
सहकारी साखर कारखाने चेअरमन आणि संचालकांच्या मालकीचे नसून हे कारखाने सभासद शेतकर्यांच्या मालकीचे आहेत. त्यामुळे साखर कारखानदार म्हणून त्यांना हिणवणे योग्य नाही. शेतकरी संघटनेमुळेच उसाला चांगला दर मिळण्यास मदत झाली, हे आम्ही कधीच नाकबूल केलेले नाही. गाळप हंगाम कमी असल्यामुळे नऊ महिने कामगारांना बसून पगार द्यावा लागतो. शेट्टी यांनी कारखान्यांचीही परिस्थिती बघून आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहनही मुश्रीफ यांनी केले आहे.