Latest

Sangli : बिबट्यांचा ऊस फडात वाढता अधिवास

backup backup

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही महिन्यांपासून वाळवा तालुक्यात बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बिबट्यांचा ऊस फडात वाढता अधिवास डोकेदुखी ठरू लागला आहे. सहज उपलब्ध होणारे भक्ष्य, पाण्याची उपलब्धता, शेकडो हेक्टर उसाचे क्षेत्र यामुळे बिबटे ऊस पट्ट्यात ठाण मांडून आहेत. तालुक्यात वाढता बिबट्यांचा वावर आणि त्यांची संख्या याबाबत सर्वजण संभ्रमात आहेत. चांदोली अभयारण्यातील बिबटे भक्ष्याच्या शोधात बाहेर पडले आहेत. या बिबट्यांनी ऊस फडांचा आश्रय घेतला आहे. (Sangli)

शिराळा तालुक्यासह वाळवा तालुक्यात शेकडो हेक्टर उसाचे क्षेत्र आहे. शिवारात असलेली कुत्री, मोर, लांडोर, झाडांवरील वानरे हे भक्ष्य म्हणून सहज बिबट्यांना उपलब्ध होत आहेत. बिबट्यांकडून शेतातील वस्तीवरील जनावरांवर, शेळ्या, मेंढ्यावर हल्ले करून त्यांचा फडशा पाडला जात आहे. येडेनिपाणी, कामेरी, ओझर्डे, सुरूल, रेठरेधरण, माणिकवाडी, महादेववाडी, वाटेगाव, कासेगाव, शेणे, नेर्ले, काळमवाडी, केदारवाडी, पेठ, कापूसखेड आदी परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. मूळ आधिवासात जाणार का? उसाच्या अधिवासातच बिबट्या मादीने बछड्याना जन्म दिल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे बछडेही ऊसफड व तेथील शिवाराला आपलेसे करू लागले आहेत. फेब्रुवारी, मार्च महिन्यात शिवारातील बहुतांशी ऊस गाळपाला गेलेला असतो. त्यामुळे ऊस फडातील बिबटे पुन्हा त्यांच्या मूळ अधिवासात जाणार का, हा संशोधनाचा विषय आहे. (Sangli)

भविष्यात लोकांना बिबट्यांचा वावर स्वीकारुन योग्य ती दक्षता घेऊनच जीवनमानात बदल करावा लागणार असल्याचे वन्य प्राणी अभ्यासकांचे म्हणने आहे. शेतकर्‍यांचा जीव मुठीत…शिराळा आणि वाळवा तालुक्याच्या हद्दीवरील गावात तर बिबट्यांचे वारंवार दर्शन होत आहे. त्यातच महावितरण कंपनीने रात्र पाळीत शेतीपंपाना रात्री 8.20 ते पहाटे 4.20 वीज दिली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना पिकांना पाणी देणे मुश्किल झाले आहे. दररोज, जीव मुठीत घेऊन शेतकर्‍यांना शिवारात जावे लागत आहे. रात्रीच्या वेळी शेतात एकटे जाणे टाळावे, जनावरांचे गोठे बंदीस्त करणे, वस्तीवरील दिवे चालू ठेवणे, लहान मुलांना एकटे न पाठवणे, पाण्यावर जाताना साथीदार नेणे, प्रखर उजेडाची बॅटरी नेणे आदी गोष्टींची दक्षता घ्यावी लागणार आहे. (Sangli)

तर महावितरणच्या अधिकार्‍यांवर मनुष्यवधाचा गुन्हा…
बिबट्यांच्या हल्ल्यात जनावरे मृत्युमुखी पडत आहेत. यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकर्‍यांना शासनाकडून मिळणारी रक्कम तूजपुंजी आहे. यामध्ये वाढ करण्यात यावी. महावितरणने शेतीपंपासाठी दिलेले वेळापत्रक चुकीचे आहे. रात्रीच्यावेळी बिबट्याच्या हल्ल्यात शेतकर्‍याचा मृत्यू झाल्यास महावितरणच्या अधिकार्‍यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू.
-बी. जी. पाटील, प्रदेशाध्यक्ष, बळीराजा शेतकरी संघटना.

प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार
राजघटनेने मानवाबरोबरच प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार दिला आहे. बिबट्यासाठी पिंजरा लावणे, जेरबंद करणे, नरभक्षक बिबट्याला ठार करणे, यासाठी क्लिष्ट प्रशासकीय प्रक्रिया पार पाडावी लागते. त्यामुळे सध्या तरी सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. रात्रीच्या वेळी बिबट्याचा वावर असलेल्या शिवारात शेतकर्‍यांनी जाणे टाळावे. महावितरणने शेतीपंपाच्या विजेच्या वेळापत्रकात बदल करावा, यासाठी महावितरणच्या अभियंत्यांना पत्र दिले आहे.
-सचिन जाधव, वनक्षेत्रपाल, वाळवा-शिराळा तालुका

हेही वाचलतं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT