Latest

…तर सना खानच्या हत्येचा नक्कीच उलगडा होईल; सनाच्या आईची महत्त्वाची मागणी

अविनाश सुतार

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या पदाधिकारी सना खान यांच्या हत्या प्रकरणाला सुमारे 5 महिन्यांचा कालावधी उलटला असताना त्यांच्या मृतदेहाचे तसेच बेपत्ता मोबाईलचे गूढ कायम आहे. मुख्य आरोपी अमित साहू याच्या आईच्या घरुन नागपूर पोलिसांना अखेर एक मोबाईल फोन व लॅपटॉप जप्त करण्यात यश आले असले तरी सनाकडे दोन विवो आणि एक एलजी असे तीन फोन होते. ते शोधण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केल्यास या हत्येचा नक्कीच उलगडा होईल, असा दावा सनाच्या आईने माध्यमांशी बोलताना केला.

आरोपी अमित व सह आरोपी कमलेश, अबू आणि इतर आरोपी पोलिसांची दिशाभूल करीत आहेत. दोन फोन नर्मदा नदीत फेकल्याचे सांगत आहेत, मग आता एक फोन कसा मिळाला? हा त्यांचा सवाल आहे. अमित साहूच्या आईच्या घरातून हे मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली असली तरी पोलिसांनी मुख्य आरोपी अमित साहूची 'पोलिग्राफ टेस्ट' आणि 'लाय डिटेक्टर टेस्ट'चे दृष्टीने कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. भाजप पदाधिकारी सना खान काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशातील जबलपूरला अमित शाहूने बोलावल्यानंतर बेपत्ता झाल्या होत्या. त्यानंतर अमित साहू त्यांच्या जिवलग मित्राने किंबहुना पतीनेच त्यांची हत्या केल्याचे समोर आले होते. मात्र, आजवर सना खान यांचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

यासोबतच अनेक रहस्य दडल्याचे सांगण्यात येत असलेला सना खान यांचा मोबाईल फोनही पोलिसांना मिळालेला नव्हता. अर्थातच आता उशिरा का होईना, हा मोबाईल पोलिस तपासात कितपत उपयोगी पडणार याविषयीची उत्सुकता सनाच्या कुटुंबियांसह सर्वांना लागली आहे. काही क्लिप्स, काही स्क्रीन शॉट यात असून यामुळे काही पदाधिकारी, स्थानिक तसेच मध्यप्रदेश, छत्तीसगड येथील व्यापारी यांना देखील पोलीस चौकशीसाठी बोलावणार असल्याचेही कळते. उपायुक्त राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर पोलीस या आव्हानात्मक प्रकरणी गेले अनेक दिवस सखोल तपास करीत आहेत. आता सापडलेल्या लॅपटॉप, फोनमधील डेटा रिकव्हरीचेही प्रयत्न सुरु असल्याने संबंधितांचे धाबे दणाणले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT