मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणी (Mumbai Drugs Case) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आता याप्रकरणी त्यांचीही खात्यांतर्गत चौकशी होणार आहे. ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांनी रविवारी वानखेडे यांच्यावर गंभीर आराेप केले हाेते. या आरोपाची चौकशी होणार असल्याचे एनसीबीने स्पष्ट केले आहे.
एनसीबीचे मुख्य दक्षता अधिकारी ज्ञानेश्वर सिंह हे समीर वानखेडे यांची चौकशी करतील. तसेच प्रभाकर साईल याचीही चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी आताच काही बाेलता येणार नाही. यांची लवकरच चाैकशी हाेईल, याबाबत आताच बाेलणे चुकीचे ठरेल, असे एनसीबीचे मुख्य दक्षता अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी नमूद केले.
मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणी पंच प्रभाकर साईल हे केपी गोस्वामी यांचा बॉडीगार्ड होते. एक प्रतिज्ञापत्र सादर करत त्यांनी समीर वानखेडे आणि साक्षीदार केपी गोसावी यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
आर्यन खानला पकडल्यानंतर २५ कोटींची मागणी कर आणि डील १८ कोटीला फायनल कर असा फोन किरण गोसावी याने फोन केला होते. त्याने मध्यस्थामार्फत २५ कोटी मागितले. यातील ८ कोटी रुपये हे समीर वानखेडे यांनाच द्यावे लागतील असेही त्याने म्हटले होते, असा गौप्यस्फोट साईल याने केला होता.