Latest

SAFF Cup 2023 : …तर अशी चूक मी पुन्हा करीन : इगोर स्टिमक

Shambhuraj Pachindre

बंगळुरु; वृत्तसंस्था : भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या फुटबॉल सामन्यावेळी रेड कार्ड मिळालेले भारतीय संघाचे कोच इगोर स्टिमक यांनी आपल्या कृतीचे समर्थन केले असून अन्यायपूर्ण निर्णयापासून आमच्या खेळाडूंना वाचवणे चूक असेल तर मी अशी चूक पुन्हा पुन्हा करीन, असे त्यांनी म्हटले आहे. (SAFF Cup 2023)

सॅफ फुटबॉल स्पर्धेत बुधवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना सुरू असताना जोरदार राडा झाला. यावेळी थ्रो इन करणार्‍या पाकिस्तानी खेळाडू अब्दुल्ला इकबालला स्टिमक यांनी रोखले आणि त्याच्याकडून बॉल काढून घेण्याचा प्रयत्न केला. यावरून हा राडा झाला. त्यावेळी पंचांनी प्रशिक्षक स्टिमक यांना रेडकार्ड दाखवले. (SAFF Cup 2023)

सामन्यात नेमके काय घडले?

भारताने या सामन्यात सुरुवातीच्या 15 मिनिटांमध्येच गोल केले होते. मध्यंतरापर्यंत भारताने या सामन्यात 2-0 अशी आघाडीही घेतली होती. हा सामना सुरू असताना फुटबॉल टच लाईनच्या बाहेर गेला त्यामुळे पाकिस्तानला थ्रो करण्याची संधी मिळाली.

त्यामुळे पाकिस्तानचा खेळाडू हा चेंडू मैदानात टाकण्यासाठी सज्ज झाला होता. पण त्यावेळी भारताचे प्रशिक्षक स्टिमक भडकले. कारण, भारताच्या खेळाडूंविरोधात फाऊल झाले होते, पण पंचांनी मात्र त्याची दखल घेतली नव्हती. त्यामुळे स्टिमक यांना राग आला आणि त्यानंतर ते पाकिस्तानच्या खेळाडूकडे गेले.

पाकिस्तानचा खेळाडू अब्दुला चेंडू मैदानात टाकण्याच्या तयारीत होता. त्यावेळी स्टिमक यांनी तो चेंडू उडवला आणि त्यानंतर राडा सुरू झाला. या सर्व प्रकारानंतर भारताचे प्रशिक्षक स्टिमक यांना मात्र रेड कार्ड दाखवण्यात आले. यानंतर सहायक प्रशिक्षक गवळी यांनी स्टिमक यांचे काम पाहिले.

सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत बोलताना सहाय्यक प्रशिक्षक महेश गवळी यांनी सांगितले की, पंचांनी नियमानुसार कारवाई केली असे म्हटले असले तरी स्टिमक यांना थेट रेड कार्ड दाखवणे ही थोडी कठोर शिक्षा होती.

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT