पुढारी ऑनलाईन डेस्क : सॅफ कपचा अंतिम सामना भारत आणि कुवेत यांच्यात आज (दि. 4) खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया १७ दिवसांत दुसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे. सुनील छेत्रीच्या नेतृत्वात भारतीय संघाने १८ जून रोजी आंतरखंडीय फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. (SAFF Championship)
सॅफ या दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडियाला कुवेतचे आव्हान आहे. या अंतिम सामन्यात भारतीय संघाकडे नवव्यांदा सॅफ स्पर्धेच्या अजिंक्यपदावर आपले नाव कोरण्याची संधी आहे. (SAFF Championship)
स्पर्धे दरम्यान भारत व कुवेत या दोन्ही देशांचा समावेश अ गटामध्ये होता. या दोन्ही देशांनी प्रत्येकी सात गुणांची कमाई करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. स्पर्धेत कुवेतने आठ; तर भारताने सात गोल केले. स्पर्धेत भारतापेक्षा एक गोल जास्त केल्यामुळे कुवेत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर राहिला.
तर, भारताचा संघ दुसऱ्या स्थानावर राहिला. भारताने उपांत्य फेरीच्या लढतीत लेबननचे कडवे आव्हान पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ असे परतवून लावले. कुवेतने जादा वेळेत गोल करून बांगलादेशचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आणले होते.
भारत-कुवेत यांच्यातील लढतीत कुवेतचे पारडे जड असल्याचे दिसून येते. दोन देशांमध्ये आतापर्यंत चार लढती झालेल्या आहेत. यापैकी दोन लढतींमध्ये कुवेतने विजय मिळवला आणि एका सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तर, एक सामना बरोबरीत सुटला.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांना कुवेतविरुद्धच्या लढतीत रेफ्रींनी रेड कार्ड दाखवले होते. रेड कार्डच्या नियमानुसार त्यांच्यावर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. उपांत्य फेरीला त्यांची अनुपस्थिती होती. आता अंतिम फेरीतही भारतीय खेळाडू त्यांच्या अनुपस्थितीत मैदानात उतरणार आहेत. त्यांच्या जागी टीम इंडियाचे सहायक प्रशिक्षक महेश गवळी या वेळी मुख्य प्रशिक्षकांची जबाबदारी पार पाडणार आहेत. टीम इंडियाचा बचावपटू संदेश झिंगन अंतिम सामन्यात पुनरागमन करणार आहे. ही संघासाठी आनंदाची बाब आहे.
भारत : ८, मालदीव : २, बांग्लादेश : १, अफगाणिस्तान : १, श्रीलंका : १.
हेही वाचा;