Latest

Russia-Ukraine crisis : पुतीन-बायडेन चर्चा निष्फळ; रशिया युक्रेनवर बुधवारी हल्ला करणारच ?

Arun Patil

वॉशिंग्टन/मॉस्को; पुढारी ऑनलाईन : रशियन सैनिकांनी युक्रेनच्या सीमा तिन्ही बाजूंनी घेरल्या असून, युद्धसरावही सुरू केला आहे. युरोपसह पश्‍चिमेकडील देशांतूनही जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. 'डेली मेल' या इंग्रजी दैनिकाने अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्याने रशिया बुधवारी युक्रेनवर हल्ला करेल, असे वृत्त प्रकाशित केले आहे.

दरम्यान, रशियाच्या युद्धखोर भूमिकेनंतर अमेरिकेनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी रशियाला इशारावजा सल्ला देताना चर्चेचा मार्गही खुला ठेवला आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यामध्ये युक्रेन मुद्यावर जवळपास एक तास चर्चा झाली, पण यामध्ये कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे युक्रेनवर रशियाकडून कारवाई झाल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा निर्वाणीचा इशारा दिला आहे. दुसरीकडे रशियाने अमेरिकेच्या भूमिकेवरून टिकास्त्र सोडले आहे.

व्हाईट हाऊसने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रशियाने युक्रेनवर चाल केल्यास अमेरिका आपल्या सहकाऱ्यांसह कडक प्रत्युत्तर देईल आणि अत्यंत कडक निर्बंध रशियावर लादेल.

दुसरीकडे युक्रेनच्या सीमांवर रशियाने आपली तिन्ही सैन्य दले तैनात केली आहेत. रशियाने 550 हून अधिक तंबू ठोकले आहेत. युक्रेन सीमेला लागून असलेल्या ओजोव समुद्रात रशियन नौसेनेचा सरावही सुरू आहे. युक्रेनला होणारा पाणीपुरवठाही रशियाने तोडला आहे.

बीजिंगमध्ये 'विंटर ऑलिम्पिक' सुरू असल्याने चीनची नाराजी नको म्हणून पुतीन या आयोजनाच्या समारोपानंतर हल्ला करतील, असे अमेरिकन गुप्‍तचर यंत्रणांना सुरुवातीला वाटत होते. पण आता रशिया 20 फेब्रुवारीपर्यंत त्यासाठी वाट बघणार नाही, असे अमेरिकन गुप्‍तचर यंत्रणेचे मत बनले आहे. बायडेन यांचे सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी सांगितले की, रशिया आता संयम ठेवणार नाही.

बायडेन यांच्यासह जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्ज, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ यांनी युक्रेनवर हल्ला केल्यास रशियावर निर्बंध लादण्याचा इशारा दिला आहे. अमेरिका आणि ब्रिटनने युक्रेनमधील आपल्या नागरिकांना तेथून लगेच बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.

हे ही वाचलं का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT