मॉस्को/कीव्ह/वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
युक्रेनची राजधानी कीव्हच्या वेशीवर रशियन रणगाडे शुक्रवारी दुपारनंतर धडकले. कीव्हमध्ये अनेक ठिकाणी रशियन सैन्य दाखल झाले असून कीव्ह पडल्यात जमा आहे. यामुळे युक्रेन शरणागती पत्करण्याची शक्यता आहे. युक्रेनने रशियाला उद्देशून पुन्हा चर्चेचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देताना शरणागतीची अट घालून शिष्टमंडळ पाठविण्याची तयारी रशियाने दर्शविली.
युक्रेनचे विद्यमान अध्यक्ष झेलेन्स्की हे नाझी प्रवृत्तीचे आहेत. त्यांना हटवून युक्रेनियन लष्कराने सत्ता हातात घ्यावी, म्हणजे वाटाघाटी करणे सुलभ होईल, असेही रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे. इकडे रशियाने युक्रेनच्या नागरी वस्त्यांवरही जोरदार हल्ले केले. कीव्हच्या उत्तर भागात रशियन रणगाडे दाखल होत असल्याचे एक चित्रणही समोर आले आहे. मध्यरात्रीनंतर एका अपार्टमेंटमध्ये स्फोट झाल्याने शेकडो नागरिक जखमी झाले. कीव्ह शहराला गुडघ्यावर आणण्याचे शत्रूने ठरवून टाकलेले आहे, असे हताश उद्गार कीव्हचे महापौर व्हिटाली क्लिटस्च्को यांनी काढले आहेत.
युक्रेनने कीव्हच्या वाटेतील तिन्ही पूल उडवून टाकलेले असले तरी लवकरच संपूर्ण कीव्ह रशियन फौजांच्या ताब्यात आलेले असेल. स्वत: युक्रेन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनीही रशियन फौजा कीव्हमध्ये दाखल झाल्याचा दावा केला आहे. दिलासादायक बाब अशी की, युक्रेनने चर्चेची तयारी दर्शविताच रशियानेही आपले शिष्टमंडळ त्यासाठी पाठविण्याची तयारी दाखवली आहे.
तत्पूर्वी, कीव्हलगतचे अँटोनोव्ह विमानतळ आता आमच्या ताब्यात आहे, असे शुक्रवारी दुपारीच रशियन फौजांनी जाहीर केले होते. 200 हेलिकॉप्टर्स या तळावर आहेत. सैनिक सज्ज आहेत. कुठल्याही क्षणी ते कीव्हमध्ये उतरतील आणि संपूर्ण शहर त्यांच्या कब्जात असेल. कीव्हमधील पोझ्निअॅक परिसरात झालेल्या रशियन हवाई हल्ल्यात 8 नागरिक जखमी झाले आहेत. हजारो कुटुंबांनी कीव्ह मेट्रो स्थानकांमध्ये आश्रय घेतलेला आहे.
रशियाने आजच शुक्रवारी काळ्या समुद्रात रोमानियाच्या एका जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला केल्याने पाण्यात आगीचे लोळ उठले आहेत. रोमानिया हा देश 'नाटो'चा सदस्य आहे. युक्रेनवर रशियाने हल्ला केलेला असला तरी युक्रेन हा देश नाटोचा सदस्य नाही. हे एक कारणही नाटोच्या फौजा अद्याप या युद्धात न उतरण्यामागे होते. आता नाटोला सबळ कारण मिळाले आहे.
अमेरिकेचीही युक्रेन विरुद्ध रशिया युद्धात प्रत्यक्षपणे न उतरण्याची भूमिका या क्षणापर्यंत कायम आहे. पण यापूर्वीच अमेरिकेनेही, जर एखाद्या नाटो सदस्य असलेल्या देशावर हल्ला झाला तर आम्ही प्रत्यक्ष रणांगणात उतरायला क्षणाचाही विलंब करणार नाही, असे स्पष्ट केलेले आहे. या क्षणापर्यंत युक्रेन-रशियातील सगळ्या वादात अमेरिका व नाटोने निवेदने देणे आणि रशियावर निर्बंध लादणे या पलीकडे काहीही केलेले नाही.
अमेरिका आणि नाटोबद्दलच नव्हे तर उर्वरित सार्या जगाबद्दल युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी, 'सर्वांनी आम्हाला एकटे पाडले', असे हताश उद्गार काढले आहेत. रोमानियाच्या जहाजावरील रशियन हल्ला आणि काळ्या समुद्रात उठलेल्या आगीच्या कल्लोळांतून युक्रेनसाठी आशेची पालवी फुटते काय, नाटो सदस्य रोमानियाच्या जहाजावरील रशियन हल्ल्यानंतर तरी नाटो आणि अमेरिकन फौजा युक्रेनच्या बाजूने रणांगणात उतरतात काय, याकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे झेलेन्स्की यांनी पुतीन यांना चर्चेचे निमंत्रण दिल्याचा दावा रशियन सरकारी माध्यमांनी केला आहे. तिकडे बायडेन यांनी पुतीन यांना उद्देशून 'युद्धखोर' हे विशेषण वापरले आहे. पुतीन आणि त्यांचा देश युक्रेनवरील हल्ल्याचे दूरगामी परिणाम भोगतील, असा शापही दिला आहे.
पुतीन यांनी शुक्रवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी फोनवरून चर्चा केली. गुरुवारी ते नरेंद्र मोदींशीही बोलले होते. झेलेन्स्कींनी पुतीन यांना चर्चेचे आमंत्रण दिलेले असले तरी रशियन परराष्ट्र मंत्री सर्जेई लावरोव्ह यांनी आधीच युक्रेनच्या संपूर्ण शरणागतीची अट त्यासाठी लावून धरलेली आहे.
युक्रेनवर रशियन हल्ल्याच्या दुसर्या दिवशी शुक्रवारी रशियाचा खोटारडेपणाही समोर आला. आम्ही फक्त लष्करी ठाण्यांवर हल्ले करीत आहोत, नागरी वस्त्यांवर नाही, असे रशिया जगाला गुरुवारपर्यंत खणकावून सांगत होता… आणि शुक्रवारी युक्रेनमधील शहरा-शहरांतील उद्ध्वस्त झालेल्या इमारतींची, बेघर झालेल्या लोकांची छायाचित्रे समोर आली. रशियाचा बुरखा फाटलेला असला तरी क्रौर्य आटलेले नाही. रशियन फौजा युक्रेनियन राजधानी कीव्हमध्ये धडकल्या आहेत.
युक्रेन संपूर्ण व विनाशर्त शरणागती पत्करत नाही तोवर हल्ले सुरूच राहतील, अशी धमकी रशियन परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी दिली आहे. शुक्रवारीही युक्रेनवरील हल्ले सुरूच राहिले. राजधानी कीव्हमध्ये सकाळीच 7 मोठे स्फोट झाले. लोकांनी रात्र सब वे, अंडरग्राऊंड शेल्टरमध्ये जागून काढली. अनेक ठिकाणी लोकांना खायला-प्यायलाही मिळेनासे झाले आहे.
भरीस भर म्हणून रशियन परराष्ट्र मंत्रीसर्जेई लावरोव्ह यांच्या वक्तव्याने युद्ध समाप्त होण्याची आशाही मालवून टाकली. 'न्यूयॉर्क टाईम्स'शी बोलताना लावरोव्ह म्हणाले, युक्रेनच्या चर्चेचा प्रस्तावच आम्हाला मंजूर नाही. आधी युक्रेनने संपूर्ण शरणागती पत्करावी, मग पुढचे काय ते पाहू!
इकडे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दोमीर झेलेन्स्की यांनी युक्रेन तसेच रशियाच्या नागरिकांना उद्देशून युद्धाच्या विरोधात निदर्शने करण्याचे आवाहन केले आहे. रशियन रणगाड्यांचा मोठा ताफा कीव्हपासून 32 कि.मी.वर येऊन थांबलेला आहे. हा ताफा पुढे सरकू नये म्हणून युक्रेनियन लष्कराने वाटेतील 3 पूल उडवून दिले. पुढच्या 96 तासांत म्हणजेच येत्या 4 दिवसांत कीव्हवर रशियन सैन्याचा ताबा असेल, अशी शक्यता स्वत: झेलेन्स्की यांनीच वर्तविली आहे. युक्रेनियन लोकांनी रशियन फौजांच्या हालचालींची लष्कराला माहिती द्यावी आणि रशियन फौजांवर पेट्रोल बॉम्ब फेकावेत, असे आवाहन युक्रेनियन संरक्षण मंत्रालयाने केले आहे.