मालेगाव; पुढारी वृत्तसेवा : सवंदगाव शिवारातील जमिनीच्या वादातून घडलेल्या गोळीबाराच्या घटनेतील संशयित आरोपी एमआयएमचे नेते तथा माजी महापौर अब्दुल मलिक मो. युनूस यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर मध्यवर्ती कारागृहाच्या प्रवेशद्वारावर हारगुच्छ तर झालाच शिवाय, मालेगावात जंगी स्वागत झाल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.
मालेगावच्या राजकीय क्षेत्रात कट्टरविरोधक असलेल्या शेख आणि युनूस कुटुंबात आता भूखंडांवरुनदेखील शीतयुद्ध सुरु झाले आहे. म्हाळदे – सवंदगाव शिवारातील विवादास्पद भुखंड ताब्यात घेण्यावरुन काँग्रेसचे माजी स्थायी समिती सभापती खलिल शेख आणि एमआयएमचे माजी महापौर तथा विद्यमान स्वीकृत सदस्य अब्दुल मलिक यांच्यात दि. 8 जानेवारीला वाद होऊन गावठी पिस्तुलातून फैरीदेखील झडल्या होत्या. याप्रकरणी नेमकी कुणी कुणावर गोळीबार केला हे अद्यापही स्पष्ट होऊन शकले नसले तरी या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळी मलिक हे घटनास्थळावरुन हटले नव्हते तर शेख हे तेव्हापासून फरार होते. याप्रकरणी पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन मलिक यांच्यासह 12 जणांवर गुन्हे दाखल झालेत. मलिक यांना अटक होऊन त्यांची नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी झाली होती. त्यांना बुधवारी (दि.22) जामिन मंजूर झाला.
त्यांच्या घरवापसीचा मोठा जल्लोष केला गेला. कारागृहाबाहेर येताच पुष्पगुच्छ देऊन वाहनांच्या ताफ्यात ते मालेगावात दाखल झाले. याठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी समर्थक कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. फटाक्यांची आतषबाजी झाली. यामुळे मुंबई – आग्रा महामार्गावर काही वेळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर गावातून जंगी मिरवणूक देखील काढली गेली. परंतु, या घटनाक्रमाकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दुसरीकडे शेख यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर सुनावणी होऊन निकाल राखून ठेवण्यात आला होता. ते शुक्रवारी मालेगाव न्यायालय परिसरात उपस्थित होते.
जंगी स्वागताची अजब प्रथा
मालेगाव यंत्रमागनगरी म्हणून प्रसिद्ध तसेच गुन्हेगारी जगतासाठीदेखील कुप्रसिद्ध आहे. विविध भागातील सराईत, अट्टल गुन्हेगारांचे मोठ्या संख्येने पंटर शहरात आहेत. एखादा 'भाई' जेलमध्येच गेला तर त्याच्या सुटकेकडे अनेकांचे डोळे लागतात. चाळीसगाव पोलिसांनी आर्म अॅक्ट अंतर्गत अटक केलेल्या हैदरअली आसिफ अली सय्यद याची सुटका झाली तेव्हा त्याचे दरेगाव शिवारात दि. 27 फेब्रुवारी 2021ला जंगी स्वागत आणि शक्तीप्रदर्शन झाले होते. त्याने स्थानिक एका नेत्याच्या फार्म हाऊसवर काही दिवस पाहुणचारही घेतला होता. याबाबत माध्यमातून टीका झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता.