Latest

पराभवानंतरच्या बैठकीत विराट कोहली अस्वस्थ होता, मग त्यानंतर…

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : विराट कोहलीने (Virat Kohli) १५ जानेवारीला सा-या क्रिकेट विश्वाला मोठा धक्का दिला. त्याने शनिवारी (दि. १५) सायंकाळी त्याच्या ट्विटर हँडलवरून एक निवेदन प्रसिद्ध केले. त्यानंतर सा-या क्रिकेट चाहत्यांना एकच झटका बसला. त्याने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात तो या पुढे टीम इंडियाच्या कसोटी संघाचा कर्णधार राहणार नसल्याचे म्हटले. या खळबळजनक बातमीने वादळ उठले. विराटला अचनाक असे काय झाले की, त्याने कसोटी कर्णधार पदाचाही राजीनामा दिला? हा प्रश्न अनेकांना सतावू लागला. पण एका रिपोर्टनुसार, विराटने सोशल मीडियावर ही घोषणा करण्यापूर्वी भारतीय संघाला याबद्दल माहिती दिली होती, असे समोर येत आहे.

शुक्रवारी 14 जानेवारीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला केपटाऊन कसोटीत पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे भारताने कसोटी मालिकाही २-१ ने गमावली. हा पराभव सा-रा भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या जिव्हारी लागला. अनेकांनी विराटने (Virat Kohli) त्या सामन्यात कसे चूकीचे निर्णय घेतले याचे विश्लेषण केले. तसेच विराटच्या डीआरएस (DRS) विरुद्ध केलेल्या वर्तनावर अनेकांनी शेलक्या शब्दात टीकाही केली.

केपटाऊन कसोटी सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियाची न्यूलँड्स ड्रेसिंग रूममध्ये बैठक झाली. सामन्यानंतरच्या या बैठकीत टीम इंडियाच्या चूकांबद्दल चर्चा झाली. त्या चूका पुढील वेळी कशा सुधाराव्यात यावरही उहापोह झाला. याचदरम्यान विराट कोहलीने एक महत्त्वाची घोषणा केली. मी कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार असल्याचे त्याने पहिल्यांदा याच बैठकीत जाहीर केले. सध्या मी जाहीर केलेल्या निर्णयाची माहिती कुठेही लिक होणार नाही याचे वचनही त्याने संघ व्यवस्थापन आणि इतर खेळाडूंकडून घेतल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

'चर्चा ड्रेसिंग रूमच्या बाहेर जाऊ नये' : कोहली

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, ड्रेसिंग रूममध्ये उपस्थित असलेल्या लोकांना मोठा धक्का देत कोहलीने म्हटले की, 'मी टीम इंडियाच्या कसोटी कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या या निर्णयाची बातमी संघ सहकारी आणि सपोर्ट स्टाफने कुणालाही सांगू नये. माझी तुम्हाला ही विनंतीही आहे. कृपया ड्रेसिंग रूमच्या बाहेर हे कोणाशीही शेअर करू नका. उद्या मी रितसर जाहीर करेन.' त्यानंतर बैठकीला उपस्थित असलेल्यांनी विराट कोहलीला वचन दिले की, ते त्याच्या राजिनाम्याबाबत कुणालाही काहीही सांगणार नाहीत.

अखेर आज विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधार पद सोडत असल्याचे जाहीर केले आणि सर्वांनाच झटका दिला. यापूर्वी त्याने T20I संघाचे कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर निवडकर्त्यांनी त्याला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या जागी रोहित शर्माला कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली.

३३ वर्षीय विराट कोहलीची २०१४ मध्ये कसोटी संघाच्या कर्णधारपदी निवड झाली होती. त्याने कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत ९९ सामने खेळले आहेत. यातील ६८ सामन्यांमध्ये त्याने भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले. त्याने कसोटीत आतापर्यंत एकूण ७९६२ धावा केल्या असून कर्णधार पदाच्या कालावधीत त्याने ५८६४ धावा केल्या आहेत.

विराट कोहलीने कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेताना लिहिले;

'सात वर्षांची मेहनत आणि संघर्ष करून संघाला योग्य दिशेने जाण्याचा मी प्रयत्न केला. मी माझे काम पूर्ण प्रामाणिकपणे केले असून कोणतीही कसर सोडली नाही. कधीतरी थांबले पाहिजे आणि भारताच्या कसोटी कर्णधारपदावरून पायउतार होण्याची हीच वेळ आहे. या प्रवासात माझ्यासाठी अनेक चढ-उतार आले आणि माझ्या वैयक्तिक कारकिर्दीतही चढ-उतार आले, पण या काळात माझ्याकडून कधीही प्रयत्नांची कमतरता आली नाही किंवा माझ्यात आत्मविश्वासाची कमतरता आली नाही. माझा १२० टक्के देण्यावर नेहमीच विश्वास होता.'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT