पुढारी ऑनलाईन डेस्क : एसएस राजामौली दिग्दर्शित 'RRR' चित्रपटाने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. 21 ऑक्टोबर रोजी जपानमध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने छप्परफाड कमाई केली आहे. रविवारपर्यंत 17 दिवसांत या RRR ने 185 मिलियन येन म्हणजेच 10.32 कोटी रुपये गल्ला जमवला आहे. अशाप्रकारे, कमाईच्या बाबतीत RRR ने आमिर खानच्या '3 इडियट्स' चित्रपटाचा विक्रम मोडीत काढला असून जपानमध्ये सर्वाधिक कमाई करणारा तिसरा भारतीय चित्रपट ठरला आहे.
ज्युनिअर एनटीआर (Jr NTR) आणि रामचरण स्टारर 'आरआरआर' (RRR) जपानमधील 44 शहरांमध्ये 209 सामान्य स्क्रीन्स आणि 31 आयमॅक्स (IMAX) स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. आमिर खानच्या '3 इडियट्स' चित्रपटाने जपानमध्ये लाईफटाईम 170 मिलियन येन कमावले. जपानमध्ये सर्वाधिक कमाई करणारा दुसरा भारतीय चित्रपट 'बाहुबली 2' आहे, ज्याने 300 मिलियन येन (रु. 16.73 कोटी) चा व्यवसाय केला. तर पहिल्या क्रमांकावर 'मुथू' चित्रपट आहे, ज्याने 400 मिलियन येन (22.32 कोटी रुपये) कमावले आहेत.
'मुथू' हा रजनीकांतचा चित्रपट आहे, जो 1995 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट 24 वर्षांनंतर जपानमध्ये प्रदर्शित झाला होता, जो तिथल्या बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. आता एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटाने 17 दिवसांत कमाईच्या बाबतीत तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे येणा-या काही दिवसांमध्ये RRR कमाईचे सर्व उच्चांक मोडीत काढेल अशी शक्यता आहे. राजामौलींच्या दिग्दर्शनाला जगभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या चित्रपटाने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. चित्रपटाची जगभरातील कमाई 1,200 कोटींच्या पुढे गेली आहे.
'आरआरआर' ही दोन क्रांतिकारकांची कथा आहे. चित्रपटात 1920 च्या दशकातील काळ दाखवण्यात आला आहे. यात देशासाठी लढणाऱ्या दोन शूरवीरांची तसेच त्यांच्या मैत्रीची कथा दाखवली आहे. अल्लुरी सीतारामन राजू आणि कोमाराम भीम या दोन पात्रांची चित्रपटातील इतिहासाच्या पानांमधून निवड करण्यात आली आहे. हे दोघे खऱ्या आयुष्यात कधीच भेटले नव्हते. पण राजामौली यांनी त्यांच्या कल्पनेतून अशी कथा विणली आहे, ज्यामध्ये दोघांची पात्रे एकत्रित रित्या दाखवली आहेत.