पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाला कसोटी संघाला नवा कर्णधार मिळाला आहे. आता तिन्ही फॉरमॅटचे नेतृत्व रोहित शर्मा (Rohit Sharma) करणार यावर शिक्कामोर्तब झाले असून, बीसीसीआयने कसोटी कर्णधारपदी त्याच्या नावाची घोषणा केली आहे. भारतीय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाबाबत माहिती दिली. यासोबतच श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या ३ सामन्यांच्या टी-२० आणि कसोटी मालिकेसाठीही टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहली आणि ऋषभ पंत यांना टी २० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, प्रियांक पांचाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत, केएस भरत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, जयंत यादव, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सौरभ कुमार.
चेतन शर्मा म्हणाले, भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. जिथे रोहित (Rohit Sharma) प्रथमच कसोटी संघाची धुरा सांभाळताना दिसणार आहे. २०१३ मध्ये भारतासाठी पहिली कसोटी खेळणारा रोहित शर्मा हा टीम इंडियाचा ३५ वा कसोटी कर्णधार असेल. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली कसोटी ४ मार्चपासून मोहाली येथे खेळवली जाणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. आता रोहित शर्माला (Rohit Sharma) कसोटी संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर भारताचा पुढचा कसोटी कर्णधार कोण, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू होती. रोहितशिवाय केएल राहुल, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांचीही नावं कर्णधारपदाच्या शर्यतीत होती, मात्र रोहित शर्माने यात बाजी मारली.
बीसीसीआयने टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 आणि कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. श्रीलंका संघाच्या दौऱ्याची सुरुवात २४ फेब्रुवारीपासून लखनऊमध्ये पहिल्या टी-20 सामन्याने होणार आहे. मोहाली येथे ४ मार्चपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. माजी कर्णधार विराट कोहली आपला १०० वा कसोटी सामना मोहालीतच खेळणार आहे.