Latest

Rohit Pawar On Ajit Pawar | ‘दादा…तुम्हीच पुरोगामी विचारधारेचा आधारस्तंभ’, रोहित पवार यांची अजित पवारांकडे मागणी

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय जनता पक्षाचे हैदराबादचे आमदार टी. राजा यांना कोल्हापूर येथे कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलंय. परंतु ते प्रक्षोभक द्वेषपूर्ण भाषणांसाठी प्रसिद्ध असल्याने कोल्हापूरसह महाराष्ट्रातील वातावरण दूषित होऊ शकते, अशी भिती शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. या संदर्भातील एक्स पोस्ट त्यांनी त्यांच्या अधिकृत X अकाऊंटवरून केली आहे. (Rohit Pawar On Ajit Pawar)

वैचारिक आक्रमण करून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न

रोहित पवार यांनी म्हटले आहे की, मा. अजितदादा, आपण नेहमीच पुरोगामी विचारांना आपल्या जीवनात प्राधान्य दिलं आहे. पुरोगामी विचारांचे उद्गाते शहर आणि महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाची वैचारिक राजधानी असलेल्या कोल्हापूर शहरात आपण नुकतंच जाऊनही आलात. कोल्हापूरने नेहमीच महाराष्ट्राला वैचारिक दिशा दिली. परंतु याचाच राग मनात धरून प्रतिगामी शक्तींकडून राजर्षी शाहू महाराजांच्या करवीर नगरीवरच वैचारिक आक्रमण करून इथलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु कोल्हापूर शहराची स्वतःची एक वैचारिक प्रतिकारशक्ती असल्याने अद्याप तरी प्रतिगामी शक्तींना यश आलेलं नाही. (Rohit Pawar On Ajit Pawar)

हीच कोल्हापूरकरांची इच्छा

याच प्रयत्नांचा भाग म्हणून आपल्या प्रक्षोभक द्वेषपूर्ण भाषणांसाठी प्रसिद्ध असलेले आमदार टी. राजा यांना कोल्हापूरमध्ये बोलावण्यात आलंय. हे आमदार कोल्हापुरात येऊन इथलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतील म्हणून अशा व्यक्तीचे कार्यक्रम कोल्हापूरसह महाराष्ट्रात कोठेही होऊ नये, अशी पुरोगामी विचारधारा जपणाऱ्या सामान्य कोल्हापूरकरांची इच्छा आहे, असे देखील आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. (Rohit Pawar On Ajit Pawar)

पुरोगामी विचारधारेचे पाईक, उपमुख्यमंत्री म्हणून या प्रश्नी लक्ष घालावे

दादा, आपण पुरोगामी विचारधारेचे आधारस्तंभ आहात. आदरणीय पवार साहेबांना सोडून प्रतिगामी शक्तींशी संगत केली असली तरी आपल्यातला पुरोगामी विचारांचा दादा अद्यापही तसाच आहे. असं मानून टी. राजा यांच्या कार्यक्रमास परवानगी देऊ नये ही सामान्य कोल्हापूरकरांच्या वतीने आपणास नम्र विनंती. स्वतःचं अपयश लपविण्यासाठी सत्ता असूनही सामान्यांच्या हिताला प्राधान्य न देता भाजपकडून केवळ महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राची विचारधारा पुसण्याचं काम केलं जात आहे. आपण पुरोगामी विचारधारेचे पाईक व उपमुख्यमंत्री म्हणून या प्रश्नी लक्ष घालाल ही अपेक्षा!, अशी मागणी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT