Latest

आरोपीची आत्महत्या : रोहा पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी, अंमलदारासह हवालदारही निलंबित

backup backup

अलिबाग; पुढारी वृत्तसेवा : रोहा पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीतील आरोपी रवी वाघमारे याने 14 एप्रिलच्या पहाटे कोठडीतच केलेल्या आत्महत्या प्रकरणी करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीअंती रोहा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय पाटील यांची तातडीने बदली करण्यात आली आहे. तर घटनेवेळी ठाणे अंमलदार असलेले सुनील पाटील व हवालदार प्रणित पाटील या दोघांना निलंबित करण्यात आले असल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांनी दैनिक पुढारी शी बोलताना दिली.

पत्नीच्या खुनाच्या आरोपात अटकेत असलेला आरोपी रवीने रोहा पोलीस ठाण्याच्या पोलिस कोठडीत गुरुवार दि.14 एप्रिलच्या पहाटे अंगावर पांघरण्यासाठी देण्यात आलेल्या चादरीची कडा वापरुन गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक अशोक दुधे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होत. दुपारनंतर महाराष्ट्रातील विविध आदिवासी सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक दुधे यांची भेट घेऊन या प्रकारास जबाबदार असणार्‍या संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

रोहा पोलीस स्थानकात घडलेली घटना ही संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे घडली असल्याचा आरोप करुन दोषींवर तातडीने कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन करु असा इशारा यावेळी महाराष्ट्र राज्य आदिम कातकरी जमाती संघटनेचे अध्यक्ष दत्तु वाघ यांनी दिला होता. तर सर्वहार जनआंदोलनाचे सोपान सुतार यांनी आपली भूमिका मांडताना, रोहा पोलीस स्थानकात अटकेत असलेला व्यक्ती आत्महत्या करतो हे दुर्दैवी आहे.

रोहा पोलीस स्टेशनचे अधिकारी यांचे दुर्लक्ष व कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडली आहे. त्यामुळे जे यामध्ये दोषी असतील त्यांचेवर कारवाई करावी अशी मागणी केली होती.

जिल्हा पोलीस अधिक्षक दुधे यांनी संपूर्ण चौकशीअंती दोषींवर कारवाई तसेच मृत आरोपीच्या कुटुबीयांना सर्वोतोपरी मदत प्रशासनाकडून करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी पुढील तपास रोहा उप विभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यंवंशी हे करित आहेत.

हे ही वाचलं का ?

SCROLL FOR NEXT