Latest

Retail Market : रिटेल क्षेत्रात १.२५ लाख कोटींहून अधिकची विक्री

अमृता चौगुले

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : नवरात्रीपासून दिवाळीच्या सुरुवातीपर्यंत, देशात 1.25 लाख कोटींहून अधिक व्यवसाय झाल्याचे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी) या संस्थेने सोमवारी सांगितले. (Retail Market)

सीएआयटीच्या आवाहनानुसार, यंदा व्यापार्‍यांनी हा सण 'अपनी दिवाळी, भारतीय दिवाळी' म्हणून साजरा केला. यात केवळ भारतीय उत्पादनांची विक्री करण्यावर भर दिला गेला. त्यामुळे लघुउद्योग, स्थानिक व्यवसाय, कारागीर, कलाकार इत्यादींकडे विक्री जोरदार झाली. त्यांनी बनवलेल्या उत्पादनांना जोरदार मागणी असल्याने त्यांचा व्यवसाय उत्तम झाला. (Retail Market)

सीएआयटीचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले, दिवाळीतील एकूण विक्री दीड लाख कोटीच्या पुढे जाण्याची अपेक्षा आहे. किरकोळ व्यापारासाठी ते एक मोठे वरदान ठरेल. जगभरात ज्या वेगाने व्यवसाय करण्याची पद्धत बदलत आहे, त्याची दखल भारतातील व्यापारीदेखील घेत आहेत आणि आपल्या व्यवसायाचे सध्याचे मॉड्यूल बदलत आहेत. बदलत्या काळाला अनुसरून ते डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. (Retail Market)

आज देशभरातील व्यापारी दिवाळीत संगणक, लॅपटॉप, मोबाईलची पूजा करतात आणि दुसरीकडे, बायोमेट्रिक मशिन, इलेक्ट्रॉनिक कॅश टेलर, डिजिटल पेमेंट स्वीकारण्यासाठी पीओएस टर्मिनल इत्यादींचाही दिवाळी पूजेमध्ये समावेश करतात. जीएसटी पोर्टलचीदेखील पूजा केली जाते. याचे कारण आता सर्व व्यवसाय जीएसटीच्या पोर्टलद्वारे केले जातात. पारंपरिक लेजर खात्यांची जागा आता जीएसटी पोर्टल आणि अनेक प्रकारच्या जीएसटी सॉफ्टवेअर्सनी घेतली आहे, असे खंडेलवाल म्हणाले.

'शतकानुशतके, भारतातील व्यापारी परंपरेने दिवाळीनिमित्त त्यांच्या व्यवसायांच्या ठिकाणी म्हणजे दुकानात वा पेढींवर दिवाळीपूजन करीत आले आहेत, परंतु बदलत्या काळानुसार, बहुतांश व्यवसाय आता डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे केले जात आहेत, म्हणून आज देशभरातील व्यापारी दिवाळीत सर्व प्रकारच्या डिजिटल साधनांची पूजा करतात', असेही ते म्हणाले.

अधिक वाचा :

SCROLL FOR NEXT