Latest

Ravi Shastri : रवी शास्त्रींना ‘कोच’ होऊ न देण्यासाठी ‘यांनी’ रचला होता कट!

रणजित गायकवाड

मुंबई; पुढारी ऑनलाईन : टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी आपल्या कार्यकाळाबद्दल धक्कादायक विधान केले आहे. त्यांच्या विधानानंतर अवघ्या क्रिकेट विश्वात खळबळ माजली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.

रवि शास्त्री (Ravi Shastri) म्हणाले की, 'ज्या प्रकारे मला संघातून वगळण्यात आले ते खूप दुःखी आहे. ही पद्धत योग्य नव्हती. मला दूर करण्याचे आणखी चांगले मार्ग असू शकतात. मी संघ सोडला तेव्हा तो चांगल्या स्थितीत होता. माझ्या दुसऱ्या कार्यकाळात मी अनेक वादानंतर आलो. मला बाहेर ठेवू पाहणाऱ्यांच्या तोंडावर लगावलेली ही चपराक होती. बीसीसीआयमधील काही लोकांना मला आणि भरत अरुणला प्रशिक्षक म्हणून बघायचे नव्हते, ज्यांना गोलंदाजी प्रशिक्षक बनवायचे नव्हते, ते भारताचे सर्वोत्तम गोलंदाजी प्रशिक्षक झाले. मी कोणत्याही एका व्यक्तीकडे बोट दाखवत नाही. मी कोणाचेही नाव घेत नाही, पण हे निश्चित आहे की, मी प्रशिक्षक न होण्यासाठी काही लोक सर्वतोपरी प्रयत्न करत होते, असा गंभीर आरोप केला.

ते पुढे म्हणाले की, मी टीव्हीवर खेळाडूंच्या मुलाखती घेतल्यामुळे संघातील एमएस धोनीशिवाय मला फारसे कोणी ओळखत नव्हते. सचिन-सौरव-राहुल-व्हीव्हीएस-अनिल हे सर्व निवृत्त झाले होते. अशा परिस्थितीत या संघाशी जोडले जाणे हे माझ्यासाठी आव्हानापेक्षा कमी नव्हते. मी संघाचे नेतृत्व करू शकेन अशा खेळाडूच्या शोधात होतो. मी विराट कोहलीत ती सर्व पात्रे पाहिली. कोहली मैदानावर आणि मैदानाबाहेर एमएस धोनीची जागा घेण्यास तयार दिसत होता, असे व्यक्त केले.

रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्याकडे २०१७ मध्ये टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली. त्याआधी २०१४ ते २०१५ च्या विश्वचषकापर्यंत ते संघाचे संचालक होते. याच काळात त्याच्यासोबत कट सुरू झाल्याचा त्यांनी आरोप केला आहे. कारण २०१५ च्या विश्वचषकानंतर शास्त्री यांना हटवण्यात आले होते. डंकन फ्लेचर यांच्यानंतर रवी शास्त्री टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक होतील असे मानले जात होते, पण ती माळ अनिल कुंबळे यांच्या गळ्यात पडली आणि ते संघाचे प्रशिक्षक पदी विराजमान झाले. पण विराट कोहलीसोबत झालेल्या वादानंतर २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलनंतर कुंबळे यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता.

कुंबळे यांच्यानंतर शास्त्री टीम इंडियाचे प्रशिक्षक झाले. पण त्यांच्या कोचिंगखाली टीम इंडियाला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. २०२१ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचूही शकला नाही. तर २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभव पत्कारावा लागला.

मुलाखतीत शास्त्री (Ravi Shastri) म्हणाले की, 'मला ज्या प्रकारे प्रशिक्षक पदावरून हटवण्यात आले ते योग्य नव्हते, याचे मला दु:ख आहे. माझ्या दुसऱ्या कार्यकाळात मी अनेक वादानंतर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झालो. आलो. ज्या लोकांना मला बाहेर ठेवायचे होते, त्यांना मारलेली ती चपराक होती.'

शास्त्री (Ravi Shastri) यांच्या प्रशिक्षक कारकिर्दीत टीम इंडियाने कसोटी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली. भारताने सलग दोन वेळा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली आणि यावर्षी (२०२१) इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली. याशिवाय भारतीय संघाने कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही प्रवेश केला होता, मात्र संघाला न्यूझीलंड संघाकडून पराभव स्विकारावा लागला.

रवी शास्त्री हे सध्या टीम इंडियाचे प्रशिक्षक नाहीत, पण समालोचन कारकीर्द जोरात सुरू असताना त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली होती. भारतासाठी ८० कसोटी आणि १५० एकदिवसीय सामने खेळलेले शास्त्री हे १९८३ च्या विश्वविजेत्या संघाचे प्रमुख खेळाडू होते. सहा चेंडूत सहा षटकार ठोकणाऱ्या या अनुभवी खेळाडूने एका सामन्यात भारतीय कसोटी संघाचे नेतृत्वही केले आहे. २०१७ मध्ये, सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि व्हिव्हिएस लक्ष्मण यांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने त्यांना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवले. करार संपल्यानंतर रवी शास्त्री यांनी नुकतीच एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली. यात त्यांनी अनेक आरोप केले आहेत, त्यामुळे क्रिकेट वर्तृळात खळबळ माजली आहे.

T20 विश्वचषकानंतर टीम इंडियाचा महान फलंदाज राहुल द्रविडला भारतीय संघाचे प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. नवे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिल्या परदेश दौऱ्यावर जात आहे. टीम इंडिया डिसेंबर-जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेत ३ कसोटी आणि ३ वनडे खेळणार आहे.

आणखी वाचा :

SCROLL FOR NEXT