पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील ख्यातनाम उद्योगपती रतन टाटा यांची पीएम केअर्स फंडच्या विश्वस्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रतन टाटा यांच्याबरोबर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती के. टी. थॉमस, लोकसभेचे माजी सभापती करिया मुंडा यांच्याही विश्वस्तपदी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या सूत्रांनी आज दिली. कोरोना साथीच्या प्रादूर्भावाच्या काळात २७ मार्च २०२० रोजी पीएम केअर्स फंडची स्थापना करण्यात आली होती. ( PM CARES Fund )
या नियुक्तीबाबत पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे की, पीएन केअर्स फंडच्या विश्वस्तांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक घेतली. यावेळी फंडचे विश्वस्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित होते. या बैठकीत रतन टाटा, करिया मुंडा आणि के.टी. थॉमस यांची पीएम केअर्स फंडचे विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ( PM CARES Fund )
तसेच या फंडवर इन्फोसिस फाऊंडेशनच्या माजी संचालक सुधा मूर्ती, माजी महालेखापाल राजीव महर्षी, इंडिफॉर्प्स आणि पिरामल फाऊंडेशनचे माजी सीईओ आनंद शहा यांची सल्लागार मंडळावर नियुक्ती झाली आहे. नवनियुक्त विश्वस्त आणि सल्लागार यांच्यामुळे पीएम केअर्स फंडच्या कामकाजाला व्यापक दृष्टीकोन मिळेल, असा विश्वासही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा :