Latest

Ranji Cricket : उनाडकट, सकारीयाची भेदक गोलंदाजी

Shambhuraj Pachindre

कोलकाता; वृत्तसंस्था : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चेतन सकारीया आणि जयदेव उनाडकट यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर सौराष्ट्राने पं. बंगालला 174 धावांत रोखले. (Ranji Cricket)

रणजी ट्रॉफी 2023 ची फायनल बंगाल आणि सौराष्ट्र यांच्यात ईडन गार्डवर होत आहे. बंगालने 33 वर्षांपूर्वी ईडन गार्डनवरच रणजी ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर त्यांना ही ट्रॉफी हातात घेण्याची संधी मिळालेली नाही. यंदाची फायनल देखील ईडन गार्डनवर होत असल्याने बंगालच्या आशा वाढल्या आहेत. मात्र, या आशेवर सौराष्ट्रने पहिल्याच दिवशी पाणी फेरले. (Ranji Cricket)

सौराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेतन साकारीया आणि जयदेव उनाडकट या स्टार गोलंदाजांनी बंगालला सुरुवातीपासूनच धक्के देण्यास सुरुवात केली. या दोघांनी बंगालची त्यांच्याच घरच्या मैदानावर 6 बाद 65 धावा अशी अवघड अवस्था करून ठेवली. या पडझडीनंतर बंगालचा अष्टपैलू खेळाडू शाहबाज अहमद, अभिषेक पोरेल यांनी बंगालची लाज वाचवली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी 101 धावांची झुंजार भागीदारी रचली.

शाहबाज अहमदने 112 चेंडूत 69 धावांची खेळी केली. त्याला पोरेलने 50 धावांची खेळी करत चांगली साथ दिली. मात्र, अखेर धर्मेंद्रसिंह जडेजाने ही जोडी फोडली. त्यानंतर चिराग जानी, जयदेव उनाडकटने बंगालचा पहिला डाव 174 धावांत गुंडाळला. सौराष्ट्रकडून चेतन सकारीया आणि जयदेव उनाडकट या दोन डावखुर्‍या वेगवान गोलंदाजांनी प्रत्येकी 3 तर जडेजा आणि चिराग जानी यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.

बंगालच्या 174 धावांच्या प्रत्युत्तरात सौराष्ट्रने आपल्या पहिल्या डावाची दमदार सुरुवात केली. आकाश दीपने सलामीवीर जय गोहिलला 6 धावांवर बाद केले. मात्र, दुसरा सलामीवीर हार्विक देसाई आणि विश्वराज जडेजाने भागीदारी रचत संघाला सत्तरी पार करून दिली. अखेर ही जोडी मुकेश कुमारने फोडली. त्याने विश्वराज जडेजाला 25 धावांवर बाद केले. सौराष्ट्रने पहिल्या दिवशीचा खेळ संपला, त्यावेळी 2 बाद 81 धावा केल्या होत्या. सलामीवीर हार्विक देसाई 38, तर चेतन सकारीया 2 धावांवर नाबाद होता.

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT