Latest

रामदास आठवले : ‘राज ठाकरेंना बाळासाहेबांची कॉपी करणं जमणार नाही’

अमृता चौगुले

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : राज ठाकरे हे कधीच बाळासाहेबांची कॉपी करू शकत नाहीत. बाळासाहेब हे फार वेगळं नेतृत्व होतं, मशिदीवरील भोंगे काढा, अशी भूमिका कधी बाळासाहेबांनी घेतली नव्हती. त्यांनी नेहमी मुस्लिम समाजाला पाठिंबा दिला, पण दहशतवादी मुस्लिमांना त्यांचा विरोध होता. त्यामुळे त्याची कॉपी करणं एवढं सोप काम नाही, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. आटपाडी येथे रिपाइंच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता निर्धार मेळाव्यात ते बोलत होते.

पक्षाचे राज्य प्रदेश सचिव विवेक कांबळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, जिल्हा युवक अध्यक्ष अशोक कांबळे, नंदकुमार केंगार, सुरेश बारसिंगे, जगन्नाथ ठोकळे आदी उपस्थित होते.

भोंगा भूमिकेवरून मंत्री आठवले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. राज ठाकरे हे सातत्याने त्यांच्या पक्षाच्या झेंड्याचे आणि स्वतःच्या भूमिकांचे रंग बदलत आहेत. आता ते भगवा रंग अंगावर घेऊन समाजात द्वेष माजवण्याचे काम करीत आहेत. भगवा रंग हा शांतीचा वारकरी सांप्रदायाचा रंग आहे. हे त्यांनी ध्यानात घ्यावं. राज ठाकरे यांच्या भोंग्यासंबंधातील भूमिकेशी आपण अजिबात सहमत नाही, असेही ते म्हणाले.

यावेळी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत रिपाइंला जागा मिळाल्या पाहिजेत. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू, साहित्यिक डॉ. शंकरराव खरात यांच्या स्मारकासाठी प्रयत्न करू, अशीही ग्वाही आठवले यांनी यावेळी दिली.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात म्हणाले, रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बळकट झाला आहे. आगामी सर्व निवडणुकीत जागा वाटपात मिळालेल्या ठिकाणी विजयी होण्याची ग्वाही दिली.

SCROLL FOR NEXT