Latest

कोल्हापूर ‘उत्तर’ची जागा काँग्रेसला सोडल्याचे दु:ख : राजेश क्षीरसागर यांची नाराजी

अविनाश सुतार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला जागा सोडली आहे. त्यानंतर गेली दोन दिवसांपासून नॉटरिचेबल असलेले राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज (रविवार) सायंकाळी माध्यमांसमोर येऊन आपली नाराजी व्‍यक्‍त केली. यावेळी क्षीरसागर यांच्या निवासस्थानासमोर मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा झाले होते. शिवसैनिकांनी घोषणाबाजी करून निवडणूक लढवण्याचा आग्रहही त्‍यांना धरला.

राजेश क्षीरसागर म्हणाले की, काँग्रेसने आतापर्यंत शिवसेनेचे ५ आमदार पाडले आहेत. त्यांच्यासाठी काेल्‍हापूर उत्तर मतदारसंघाची जागा सोडणे मनाला लागले आहे. ही जागा काँग्रेसला सोडताना दु:ख होत आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत माझ्याबद्दल मतभेद पसरवले गेले; परंतु या निवडणुकीतील परभवानंतर डगमगलो नाही. नेहमी शिवसेनेसाठी कार्यरत राहिलो. कोल्हापूरच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला.

२०१९ च्या निवडणुकीत मी निवडून आल्यानंतर मी  पालकमंत्री होईन, या भीतीमुळे सर्वांनी एकत्रित येऊन माझा पराभव केला, असाही आरोप क्षीरसागर यांनी यावेळी केला. उत्तरची पोटनिवडणूक तिरंगी व्हायला हवी होती; परंतु ही जागा काँग्रेसला सोडण्यात आल्याचे मोठे दु:ख होत आहे, अशी नाराजी व्‍यक्‍त करत शिवसेनेला न्याय कधी मिळणार, असाही सवालही त्यांनी केला. दरम्यान, शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत निवडणूक लढविण्याचा आग्रह ठेवला. आता क्षीरसागर कोणती भूमिका घेणार ? महाविकास आघाडीत बंडाळी होणार का ? याकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचलंत का ? 

पाहा व्हिडिओ : 'झुंड' मधून नागराज मंजुळेंना नेमकं काय सांगायचं आहे ? : नागराज मंजुळेंशी खास गप्पा | jhund movie

SCROLL FOR NEXT