Latest

Rajaram Sakhar Karkhana Result : कोल्हापूरच्या राजाराम कारखान्यावर महाडिक यांची पुन्हा एकहाती सत्ता

अमृता चौगुले

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा बावडा येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आ. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी परिवर्तन आघाडीचा धुव्वा उडवत महादेवराव महाडिक यांना कारखाना आपल्या ताब्यात ठेवण्यात यश आले. अटीतटीच्या लढतीत महाडिक यांच्या नेतृत्वाखील शेतकरी विकास आघाडीचे सर्व 21 उमेदवार विजयी झाले. या वेळच्या निवडणुकीत 'आमचं ठरलंय कंडका पाडायचा' अशी टॅगलाईन घेऊन प्रचाराचा धुरळा उडविणार्‍या आ. पाटील गटाचा कंडका महाडिक गटाने पाडला आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक सलग सहाव्यांदा संस्था गटातून कारखान्यावर संचालक म्हणून निवडून आले आहेत. (Rajaram Sakhar Karkhana Result)

आरोप-प्रत्यारोपाने गाजलेल्या आणि टोकाची ईर्ष्या निर्माण झाल्यामुळे राजाराम कारखान्याच्या निवडणूक निकालाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. या निवडणुकीसाठी ईष्येने 91.12 टक्के मतदान झाले होते. मंगळवारी बहुउद्देशीय सभागृहामध्ये मतमोजणी ठेवण्यात आली होती. यासाठी सत्तारूढ आणि विरोधी आघाडीचे उमेदवार, मतमोजणी प्रतिनिधी सकाळी साडेसातपासूनच मतमोजणी केंद्रावर हजर होते. सकाळी आठ वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली. प्रारंभी गटनिहाय मतपत्रिका वेगळ्या करून 50 चे गठ्ठे करण्यात आले. मतपत्रिकांचा मेळ घेतल्यानंतर प्रत्यक्ष 9.40 वा. मतमोजणीला सुरुवात झाली. (Rajaram Sakhar Karkhana Result)

दोन फेर्‍यांमध्ये मतमोजणी झाली. पहिल्या फेरीत 1 ते 29 तर दुसर्‍या फेरीत 30 ते 58 मतमोजणी केंद्रावरील मत मोजणी झाली. पहिल्या फेरीतील उत्पादक गट क्रमांक एकची मोजणी सकाळी साडेदहाच्या सुमारास पूर्ण झाली. यामध्ये सत्ताधारी आघाडीचे उमेदवार 800 हून अधिक मतांनी आघाडीवर राहिले. पहिल्या फेरीतील उत्पादक गट क्रमांक 2 मधील सत्ताधारी आघाडीचे उमेदवार 800 हून अधिक मतांनी आघाडीवर होते. यानंतर गटनिहाय मतमोजणी सुरू राहिली. दुपारी दीडपर्यंत पहिल्या फेरीतील सर्व मतमोजणी पूर्ण होऊन सत्तारूढ आघाडीचे सर्व उमेदवार 624 ते 844 मतांनी आघाडीवर राहिले. (Rajaram Sakhar Karkhana Result)

दुपारी दोन वाजता दुसर्‍या फेरीतील मतमोजणीला सुरुवात झाली. केंद्र क्र. 30 ते 58 या 29 केंद्रांच्या पेट्या 29 टेबलवर देण्यात आल्या. दरम्यान केंद्र क्र. 58 वर संस्था गटातील मतमोजणी होणार असल्याने मतमोजणी केंद्रातील बहुतांशींच्या नजरा याकडे लागून राहिल्या. संस्था गटात केवळ 128 मतदान झाले होते. मतपत्रिकांचे 50 चे गठ्ठे करत असतानाच काहींनी छायाचित्रे, त्याचबरोबर चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. याला निवडणूक अधिकार्‍यांनी आक्षेप घेतला. यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली. अवघ्या दहा मिनिटांत दोन वाजून दहा मिनिटांनी संस्था गटाचा निकाल जाहीर झाला. संस्था गटातून गेली अनेक वर्षे निवडून येत असलेले माजी आ. महादेवराव महाडिक यांनी पुन्हा एकदा या गटात वर्चस्व सिद्ध केले. त्यांना 83 तर विरोधी आघाडीचे उमेदवार सचिन पाटील यांना 44 मते मिळाली. या गटातून महादेवराव महाडिक 39 मतांनी विजयी झाले.

दुसर्‍या फेरीत कारखान्याचे सर्वाधिक सभासद असलेल्या कसबा बावडा आणि शिरोली या गावांचा समावेश होता. कसबा बावडा येथे झालेल्या 919 मतदानापैकी 605 मते विरोधी आघाडीला तर 309 मते सत्तारूढ आघाडीला मिळाली. कसबा बावडा येथील मताची टक्केवारी विरोधी आघाडीला 66 टक्के तर सत्तारूढ आघाडीला 34 टक्के अशी राहिली. पुलाची शिरोली येथे सत्तारूढ आघाडीच्या उमेदवारांना 707 तर विरोधी आघाडीच्या उमेदवारांना 127 मते मिळाली. पुलाची शिरोली येथील मताची टक्केवारी सत्तारूढ आघाडीला 83 टक्के तर विरोधी आघाडीला 17 टक्के अशी राहिली.

निवडणुकीच्या निकालाचा कल स्पष्ट झाल्यानंतर माजी आमदार अमल महाडिक सायंकाळी सव्वापाच वाजता मतमोजणी केंद्रावर दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर घेऊन विजयाच्या घोषणा देत गुलालाची उधळण केली. मतपेट्यांमध्ये अनेक चिठ्ठ्या सापडल्या. यामध्ये दोन्ही आघाड्यांच्या प्रमुखांना तसेच आघाड्यांच्या प्रचारात तसेच नियोजनामध्ये पुढारपण करणार्‍यांना कानपिचक्या देण्यात आल्या होत्या.

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT