पनवेल विक्रम बाबर : पुढारी वृत्तसेवा मुंबई शहरातील वाढत्या वायू प्रदूषनाचा मुद्दा सध्या चांगला चर्चेत आला आहे. या वाढत्या वायू प्रदूषणावर न्यायालयाने नाराजी व्यक्त करत चक्क ताशेरे ओढले आहेत. हे वाढते वायू प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करा असे आदेश देखील दिले आहेत. या आदेशानंतर शासनाकडून वेगवेगळे प्रयोग राबवले जाऊ लागले. आता पनवेल महानगरपालिकेने देखील हे वाढते वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एक अनोखा प्रयोग राबवत वायू प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न केला आहे.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील सायन पनवेल महामार्गावरील खारघर टोल नाक्यावर येणाऱ्या चारचाकी गाड्यांवर पाण्याचे फवारे मारून गाड्यांवरील धूळ कमी करण्याचा प्रयोग पनवेल महानगरपालिकेने सुरू केला आहे. आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदशनाखाली या प्रयोगाला आज सुरूवात करण्यात आली आहे. यासाठी टोल नाक्यावरील कॅश काऊंटर शेजारी पाण्याचे पाईप उभा करून, त्या पाईपच्या माध्यमातून पाण्याचा फवारा टोल नाक्यावर येणाऱ्या चार चाकी गाड्यांवर मारले जाणार आहेत. याची सुरूवात शुक्रवारी करण्यात आली आहे. या प्रयोगामुळे, गाड्यांवरील धूळ कमी होऊन त्या गाड्या मुंबईत जातील असा विश्वास आयुक्त गणेश देशमुख यांनी व्यक्त केला आहे. तसेच हा प्रयोग पुढील ५ ते ६ दिवस राबवण्यात येणार असल्याची माहितीही आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली आहे.
पाण्याची १० हजार लीटरची टाकी बसविण्यात आली असून, एकावेळी १२ नोझल टोलनाक्यावर सुरू आहेत. तसेच एका टाकीतील पाणी २ तासांत संपल्यानतंर पुन्हा नव्याने टाकी भरली जाते. तासाला ३०० ते ३५० गाड्यांवर हा पाणीमारा केला जात असल्याची माहिती आयुक्त देशमुख यांनी दिली. स्वतः आयुक्तांनी ही यंत्रणा व्यवस्थित चालविली जाते का, याचा आढावा घेतला आहे.
हेही वाचा :