Latest

AAP’s Punjab winners : ‘आप’चे १२ डॉक्‍टर, ७ वकील, आरटीआय कार्येकर्ते पंजाब विधानसभेत

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क
आपल्‍याकडे लोकप्रतिनिधी आणि त्‍याचं शिक्षण हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. राजकारणाच्‍या रिंगणात उच्चविद्याविभुषित उमेदवारांची गर्दी तशी कमीच दिसते. मात्र पंजाबमध्‍ये हा निकष आम आदमी पार्टीने ( आप ) बदलला आहे. नुकतेच पंजाब विधानसभा निवडणुकीत ११७ जागांपैकी ९२ जागांवर 'आप'चे उमेदवारांनी विजय ( AAP's Punjab winners )  नोंदवला. यातील तब्‍बल ८२ जण हे नवोदित आहेत. म्‍हणजे ते प्रथमच विधानसभेचे पायरी चढत आहेत. यातील अनेक जण सामाजिक आणि उद्‍योग जगतातील असून, आपचे बहुतांश उमेदवार हे उच्चविद्याविभुषित आहेत.

'आप'चे आमदार झालेल्‍यांमध्‍ये १२ डॉक्‍टर, ७ वकील, दोन लोकप्रिय गायक, दोन पंजाबमधील निवृत्त पोलिस अधिकारी, महसूल अधिकारी, ऑक्‍सफर्डचे पदवीधर, माहिती अधिकार कार्यकर्ते आदींचा समावेश आहे.

AAP's Punjab winners : माेबाईल दुरुस्‍त करणार्‍या तरुणाने चेन्‍नींचा केला  पराभव

पंजाब विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय नोंदवल्‍यानंतर आपचे निमंत्रक आणि दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल म्‍हणाले होते की," आम आदमी पार्टी हा देशातील सर्वसामान्‍य नागरिकांचा पक्ष आहे. याचे उदाहरण म्‍हणजे, पंजाबमध्‍ये निवडणून आलेल्‍या लाभ सिंग उगोके हा स्‍वच्‍छता कामगाराचा मुलगा आहे. लाभ सिंग हा स्‍वत: एका मोबाईल दुकानामध्‍ये मोबाईल फोन दुरुस्‍तीचे काम करत होता. लाभसिंग याने भदौर मतदारसंघात पंजाबचे माजी मुख्‍यमंत्री चरणजीत सिंग चन्‍नी यांचा पराभव करत नवा इतिहास घडवला आहे.
पंजाब विधानसभा निवडणुकीत ११७ जागांपैकी 'आप'ने ९२ जागांवर विजय मिळवला. काँग्रेसला १८ जागांवरच समाधान मानावे लागले. तर शिरोमणी अकाली दल, भाजपला अनुक्रमे ३, २ जागा मिळाल्‍या. बसप आणि अपक्षांना प्रत्‍येकी २ जागांवर समाधान मानावे लागले.

आपचे उमेदवार उच्चविद्याविभुषित

गुरिंदर सिंग हे 'आप'चे नूतन आमदार आहेत. त्‍यांनी २०१४ मध्‍ये लंडनमधील विश्‍वविख्‍यात ऑक्‍सफर्ड विद्‍यापीठातून एमबीए पदवी संपादन केली आहे. भारतात परतण्‍यापूर्वी ते एका आंतरराष्‍ट्रीय टेलिकॉम कंपनीत नोकरी करत होते. भारतात परत्‍यानंतर ते आपचे पंजाबमधील सल्‍लागार झाले. आपल्‍या विजयाबाबत त्‍यांनी म्‍हटलं आहे की, सर्वसामान्‍य जनतेचा मन:पूर्वक पाठिंबा हेच आम आदमी पार्टीचे मूळ भांडवला आहे. आपचा सल्‍लागार व नियोजनासंदर्भात काम करताना मला जाणावलं की, आपमध्‍ये सार्वजनिक कल्‍याणाचे काम करण्‍याची मोठी संधी आहे. त्‍यामुळे मी आपमध्‍ये सक्रीय होण्‍याचा निर्णय घेतला.

आपचे आमदार झालेले १२ जण हे व्‍यवसायाने डॉक्‍टर आहेत. डॉक्‍टर चंद्रजीत सिंग यांनी चमकौर साहिब मतदारसंघात मुख्‍यमंत्री चन्‍नी यांचा पराभव केला. तसेच अभिनेता सोनू सूद याची बाहिण मालविका सूद यांचा मोगा मतदारसंघातून पराभव करणारे अमनदीप अरोरा हेही डॉक्‍टर आहेत. अमृतसर दक्षिण, पश्‍चिम आणि मध्‍य या तीन मतदारसंघातून निवडणूक जिंकलेले तिन्‍ही उमेदवार हे डॉक्‍टर आहेत. अनमोल मान आणि बलकर सिध्‍दु हे दोघेही प्रसिद्‍ध गायक आहेत. आपच्‍या सर्व उमेदवारांनी बदलासाठी राजकारण या मुद्‍यावर प्रचार केला. तसेच त्‍यांच्‍या स्‍वच्‍छ प्रतिमेचाही पक्षाला फायदा झाल्‍याचे आपच्‍या नेत्‍यांनी म्‍हटलं आहे.

२०१४ मध्‍ये शिरोमणी अकाली दलाचा भ्रष्‍टाचार चव्‍हाट्यावर आणल्‍यानंतर वकील दिनेश चढृढा हे चर्चेत आले होते. यंदाच्‍या निवडणुकीत रुपनगर मतदारसघात बाजी मारली. तर बलकार सिंग हे मागील वर्षी पोलीस आयुक्‍त पदावरुन निवृत्त झाले होते. 'मी पोलिस खात्‍यात सेवा बजावत असताना समाजातील गरीब जनतेला न्‍याय मिळावा यासाठी नेहमीच प्रत्‍यन केला. तसेच त्‍यांचे सर्वसामान्‍य जनतेचे प्रश्‍न सोडविण्‍यास प्राधान्‍य दिले. अशाच प्रकारचे काम मला राजकारणात करता येईल म्‍हणून मी आपमध्‍ये प्रवेश केला', असे बलकार सिंग यांनी सांगितले.

निवृत्त पोलिस उपायुक्‍त जसविंदर सिंग यांचे वडील शरोमणी अकाली दलात होते. २०११ मध्‍ये त्‍यांनी काँग्रेसमध्‍ये प्रवेश केला होता. मात्र काँग्रेसला सोडचिठ्‍ठी देत त्‍यांनी २०१९ मध्‍ये आम आदमी पार्टीमध्‍ये प्रवेश केला. आप हा एक लोकशाही असणारा पक्ष आहे. लोकांचा, लोकांसाठी लोकांनी तयार केलेला हा एकमेव पक्ष असल्‍याचेही ते सांगतात. एकुणच आपच्‍या उच्चविद्याविभुषित उमेदवारांची चर्चा सध्‍या पंजाबच्‍या राजकीय वर्तुळाबरोबर सर्वसामान्‍य नागरिकांमध्‍येही रंगली आहे. आता ते राजकारणात कोणता बदल करणार हे आगामी काही महिन्‍यांमध्‍येच स्‍पष्‍ट होणार आहे.

हेही वाचलं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT