Latest

जागतिक युवा दिन विशेष : ‘स्टार्ट अप’मध्ये मुंबईनंतर पुण्याची बाजी

अमृता चौगुले

पुणे : नवउद्योजकांना संजीवनी देण्यासाठी 'स्टार्ट अप'च्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नाचा सर्वात जास्त फायदा महाराष्ट्राने उचलला आहे. देशात असलेल्या 88 हजार 136 पैकी 16 हजार 250 स्टार्ट अप उद्योग महाराष्ट्रात असून, मुंबई प्रथम तर पुणे दुसर्‍या क्रमांकावर आहे. येत्या दोन वर्षांत स्टार्ट अप उद्योगाची भरारीत जास्तीत जास्त महिला उद्योजक घडविण्याचे उद्दिष्ट शासनाने ठरविले आहे. केंद्र सरकारने नवउद्योजक, रोजगार निर्मितीसारखी एकसंध संस्था तयार करण्याच्या उद्देशाने 2016 पासून 'स्टार्ट अप इंडिया' हा उपक्रम सुरू केला.

नावीन्यपूर्ण स्टार्टअप धोरणाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीमार्फत राज्यातील सर्व घटकांकरिता स्टार्टअप व नावीन्यता क्षेत्राशी संबंधित विविध योजना, उपक्रम व कार्यक्रम राबविले जातात. या उपक्रमांमुळे नवउद्योजकांना उद्योजकतेशी निगडित विविध प्रकारचे सहाय्य व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले.

देशात महाराष्ट्र अव्वल

2018 पासून प्रत्यक्षात सुरू झालेल्या 'स्टार्ट अप'मध्ये महाराष्ट्राने उद्योजक घडविण्यात बाजी मारली आहे. देशातील एकूण 88,136 स्टार्ट अप्स पैकी सर्वाधिक 16,250 (18 टक्के) हे स्टार्ट अप्स महाराष्ट्रातील आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान 5 ते 7 स्टार्ट अप असून, अगदी दुर्गम अशा गडचिरोली जिल्ह्यातही 12, नंदूरबार 20, स्टार्ट अप आहेत. राज्यात सर्वाधिक स्टार्ट अप मुंबईत म्हणजेच 5,900, पुणे 4535, छत्रपती संभाजीनगर 342, सिंधुदुर्ग 19, स्टार्ट अप्स कार्यरत आहेत.
स्टार्ट अपच्या उद्योजकांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आले.

महाराष्ट्रात 25 युनिकॉर्नस्

देशात सध्या 2,44,000 स्टार्टअप्स असून त्यापैकी राज्यात 88,136 स्टार्ट अप सुरू आहेत. देशातील आज 108 युनिकॉर्न स्टार्ट अप्सपैकी 25 युनिकॉर्नस् महाराष्ट्रातील आहेत (23 टक्के) (युनिकॉर्न म्हणजे अशी कंपनी जिचे मूल्यांकन 1 बिलियन अमेरिकन डॉलर्स (100 करोड डॉलर) म्हणजेच रुपये 8000 कोटींपेक्षा जास्त आहे.)

देशात सर्वाधिक महाराष्ट्रात असून, मुंबई बरोबरीने पुणेही आघाडीवर आहे. पुण्यात सर्वाधिक स्टार्ट अप असले तरी त्यांची अद्यापपर्यंत नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. अनेक स्टार्ट अप घरातून सुरू केले आहेत. 18 ते 25 वयोगटातील युवकांची संख्या मोठी आहे.

– अतुल खेरडे, संचालक सुश्रुत स्टार्ट अप, पुणे

स्टार्ट अप उद्योजकांसाठी सायन्स टेक्नॉलॉजी पार्कच्या वतीने त्यांच्या प्रस्तावावर अभ्यास करून अर्थसहाय्य केले जाते. संशोधित स्टार्ट अपला मंजुरी देत अर्थसहाय्यही केलेले आहे. आतापर्यंत छोट्या-मोठ्या 40 स्टार्ट अपला भरीव निधी देण्यात आलेला आहे.

– राजेंद्र जगदाळे, संचालक- सायन्स टेकॉलॉजी पार्क, पुणे

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT