Latest

पुणे : १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपींचे महाविकास आघाडी समर्थन करतेय का? : चंद्रकांत पाटील

अविनाश सुतार

पुणे, पुढारी वृत्तसेवा : नवाब मलिकांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडी सरकारमधील सर्व घटक पक्षांचे नेते महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निदर्शनाला बसले. त्यामुळे १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आणि त्यांच्याशी आर्थिक हितसंबंध असणाऱ्यांचे ते समर्थन करतात का?, असा सवाल भाजप‌ प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  (Chandrakant Patil) यांनी केला. तसेच शिवसेनेचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील प्रेम सोईचे असल्याचा घणाघातही त्यांनी यावेळी केला. ते‌ पुण्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे माध्यमांशी बोलत होते. (pune)

आमदार पाटील म्हणाले की, १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपीसोबतचे जमीन खरेदी-विक्रीसंदर्भातील पुराव्यांच्या आधारे नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले. कसून चौकशीनंतर ईडीने त्यांना अटक केली. परंतु , महाविकास आघाडी सरकार याचा निषेध करत असल्यामुळे हा १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपींना पाठिशी घालण्याचाच प्रकार आहे.

घटनात्मक दृष्ट्या एखाद्या सरकारी नोकरदाराला अटक झाल्यानंतर २४ तासांच्या आत त्याचे निलंबन करायचे असते. तसेच चार्टशीट दाखल झाल्यानंतर त्याला सेवेतून बडतर्फ करावे लागते. त्यानुसार मंत्र्याच्या अटकेनंतर ही प्रक्रिया का राबवली जात नाही, असा सवाल करत मलिकांच्या अटकेनंतर मंत्र्यांना महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यास कोणी परवानगी दिली, याचीही सखोल चौकशी झाली पाहिजे,  अशी मागणी पाटील (Chandrakant Patil) यांनी यावेळी केली.

संजय राठोड यांचा राजीनामा शिवसेनेनं तातडीने घेतला. पण नवाब मलिकांच्या अटकेनंतर त्यांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस टाळाटाळ करत आहे. त्यामुळे शिवसेनेने याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे.
तीन पक्षांनी एकत्रित येऊन 'कॉमन मिनिमम प्रोग्राम' ठरवला आहे, त्यानुसार एकमेकांच्या निष्ठांना धक्का लागू नये, याची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे टिपू सुलतानची जयंती साजरी केली, तर त्यांना चालतं. पण सावरकरांमुळे शिवसेना सोडून इतर दोन पक्षांच्या निष्ठा, मन दुखावणार असेल, तर सावरकर प्रेम जाहीर करायचं नाही, हे त्यांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे सोयीनुसार शिवसेना सावरकर प्रेम व्यक्त करत असते, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT