Latest

पबजीच्या नादात नांदेडचा अल्पवयीन मुलगा पोहोचला नाशिकरोडला

गणेश सोनवणे

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
एक अल्पवयीन मुलगा पबजी खेळत आपल्याच नादात रेल्वे एक्स्प्रेसमधून निघाल्याची माहिती नाशिकरोड रेल्वेस्थानक पोलिसांनी मिळाली होती. पोलिसांनी रेल्वेगाड्यांचा कसून शोध घेत अखेर मुंबईला जाणार्‍या तपोवन एक्स्प्रेसमधून त्याला ताब्यात घेतले. मुलगा सुखरूप पाहून त्याच्या पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

नागेश असे या मुलाचे नाव आहे. तो हरविल्याची तक्रार वडील माधव जावरे यांनी नांदेडच्या कुंटूर पोलिस ठाण्यात दिली होती. नागेशचे फोटो मिळवून नाशिकरोड रेल्वे पोलिसांनी आपल्या ग्रुपवर पाठविले. रेल्वेगाडीची वेळ झाल्याने पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी सहकार्‍यांसह गस्त सुरू केली.

गाडी नाशिकरोडच्या फलाट तीनवर आली असता, पोलिस विजय कपिले यांनी कसून तपासणी सुरू केली. एका डब्यातून प्रवाशांसोबत लहान मुले उतरली. त्यातील एक मुलगा चेहरा लपवून चालला होता. त्याला हटकले असता, त्याने नातेवाईक स्थानकाबाहेर असल्याची माहिती दिली. या मुलाला नाव विचारल्यावर त्याने फक्त नागेश असे सांगितले. पोलिसांनी नागेशबाबत तपास सुरू असल्याचे सांगितले. नागेशचे वडील त्याला नाशिकरोडला घेण्यास आले.

मित्राला भेटण्याचा बनाव

नागेश हा नांदेडला आत्या सरूबाईकडे राहात असताना, करणशी मैत्री झाली. त्याच्यामुळे मोबाइलवर फ्री फायर हा टाइमपास गेम खेळण्याची सवय लागली. करण दोन महिन्यांपासून नाशिकला निघून गेला. तेथे तो शेतीचे काम करतो. नागेशने त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. करणने त्याला नाशिकरोडला आल्यावर भेटतो, असे सांगितले होते. त्याला भेटून एक दिवस थांबून नागेश पुन्हा नांदेडला आई-वडिलांकडे जाणार होता. त्याच्याकडे साठवलेले 550 रुपये होते. त्यातून तो राहेर ते नरसी आणि नरसी ते नांदेडला पोहोचला. तेथे रेल्वेस्थानकापर्यंत आला. मात्र, रेल्वेचे तिकीट न मिळाल्याने तपोवन गाडीत लपतछपत प्रवास केला. नाशिकरोडला पोहोचल्यावर करणकडे एक दिवस मुक्कामी जाणार होता. मात्र, तपासात पोलिसांना त्याचा असा कोणताही मित्र आढळला नाही.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT